Diveagar gram panchayat election result Raigad NCP defeat details : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना बालेकिल्ल्यात जोरदार धक्का बसला आहे. दिवेआगार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. श्रीवर्धनमधील दिवेआगार ग्रामपंचायतमध्ये 'दिवेआगार विकास आघाडी'चे विजय तोडणकर सरपंचपदी निवडून आले आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय.
रायगड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आज त्याचा रिझल्ट जाहीर झाला. पण दिवेआगारमध्येच तटकरेंना जोरदार धक्का बसला आहे. श्रीवर्धन हा मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. काही दिवसांपूर्वीच म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला होता, आता दिवेआगारसारखी महत्त्वाची ग्रामपंचायतही राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे. मनमानी, हुकूमशाही आणि लोकांना गृहीत धरण्याचे राजकारण दिवेआगारमध्ये चालणार नाही, असा सल्ला नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे.
दिवेआगार ही ११ सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. पण राष्ट्रवादीविरोधी गटाने ८ सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल देत ८ सदस्यांचे सदस्यपद रद्द केले होते. या रिक्त ८ जागा आणि सरपंचपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये सरपंच आणि ३ सदस्य दिवेआगार विकास आघाडीचे (राष्ट्रवादीविरोधी गट) निवडून आले आहेत.
नंदुरबार - नवापूरच्या खांडबारा सरपंचपदी दिपाली गावित
नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांच्या पॅनलने दमदार विजय मिळवत प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली आहे. सरपंचपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत दिपाली जगदीश गावित यांनी तब्बल १,१०० मतांनी विजय संपादन करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली. या निवडणुकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरीष नाईक, माजी आमदार शरद गावित आणि भरत गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आजी-माजी आमदारांच्या पॅनलविरोधात भरत गावित यांच्या पॅनलने विजय मिळवत खांडबारात आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या ८० जागांसाठी आज मतमोजणी पार पडली, मात्र सर्वाधिक लक्ष खांडबारा सरपंचपदाच्या निवडणुकीने वेधले होते. या निकालानंतर खांडबारा परिसरात भरत गावित गटाकडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.