शिवसेना आमदार अपात्रतेवर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार याकडेच सर्वांच्या नजरा आहे. अशातच राहुल नार्वेकर आपल्या वेळापत्रकात कुठलाही बदल करणार नसल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)
राहुल नार्वेकर हे गेल्या सुनावणीत सादर केलेलं वेळापत्रक पुन्हा या सुनावणी सादर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यासाठी त्यांनी कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केल्याची देखील माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लेखी आदेश दिले, तरच आपण वेळापत्रक बदलणार असल्याची भूमिका राहुल नार्वेकर यांनी घेतल्याची माहिती आहे.
आम्ही सादर केलेल्या वेळापत्रकात काय चूका आहेत, त्या न सांगता थेट सुधारित वेळापत्रक मागवल्याने विधानसभा अध्यक्ष ही भूमिका घेण्याची शक्यता आहे. आधी सादर केलेल्या वेळापत्रकातील चुका सांगितल्या तरच आम्ही सुधारित वेळापत्रक देण्याबाबत विचार करणार, अशी भूमिका विधानसभा अध्यक्षांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आज सुप्रीम कोर्टात सुधारित वेळापत्रक दिलं नाही. तर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मागील सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले होते. इतकंच नाही तर, कोर्टाने आमदार अपात्रतेबाबत सादर केलेलं वेळापत्रक अमान्य केलं होतं.
पोरखेळ करताय का? विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) राहुल नार्वेकरांना सुनावलं होतं. तसेच पुढच्या सुनावणीत आमदार अपात्रतेसंदर्भात नवीन वेळापत्रक सादर करा, असे निर्देश कोर्टाने दिले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.