मुंबई : मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात ‘कोविड - १९’ (Covid 19 ) या आजारास प्रतिबंध व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून (ता. 15) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार, १६ जानेवारी २०२१ पासून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण महिमेला सुरुवात झाली. त्यानंतर १९ मे २०२१ पासून स्तनदा मातांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तर आता ‘राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट’ व ‘कोविड - १९’ लसीकरणासाठी असलेला ‘राष्ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्या शिफारशीनुसार भारत सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड - १९’ लसीकरणात समाविष्ट केले आहे.
सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘कोविड - १९’ या आजाराचा तीव्र संसर्ग (severe infection) होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच ‘कोविड - १९’ बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति (pre-term delivery) होण्याचे प्रमाण अधिक आहे. ‘कोविड - १९’ बाधित ९०% गरोदर महिलांना दवाखान्यात भरती होण्याची गरज भासत नाही. परंतु सुमारे १०% गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे ‘कोविड - १९’ आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते, अशावेळी अचानक प्रकृती ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते. केंद्र सरकारने गर्भवती महिलांचे ‘कोविड - १९’ लसीकरण करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधीत लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात.
२. प्रत्येक गरोदर महिलेने या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी व पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने (informed choice) लसीकरण करवून घ्यावे.
३. ज्या महिलांना ‘कोविड - १९’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ किंवा ‘convalescent’ प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना १२ आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल.
‘कोविड - १९’ लसीकरणानंतर, काही लाभार्थ्यांमध्ये सौम्य स्वरुपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा १ ते ३ दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते. तुरळक स्वरूपात १ ते ५ लाख लोकांमधील एखादया लाभार्थ्यास लसीकरणानंतर २० दिवसापर्यंत गंभीर लक्षणे आढळून येऊ शकतात.
गरोदर महिलांना कोविड लसीकरण व याबाबतचे समुपदेशन करण्याबाबत सर्व संबंधीत कर्मचा-यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले असून, गुरुवार दिनांक १५ जुलै २०२१ पासून गर्भवती महिलांसाठी ‘कोविड - १९’ लसीकरण सुरु करण्यात येत आहे. सदर लसीकरण पहिल्या टप्प्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे व काही शासकीय रुग्णालयांमध्ये देखील सदर लसीकरण करण्यात येणार आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.