आझाद मैदानावर उद्या मराठा बांधवांचा जनसागर उसळणार
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन
सोलापूरसह राज्यभरातून २५ हजार वाहनांचा ताफा मुंबईकडे
मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याची निर्णायक परीक्षा उद्या
मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्टातून लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गावोगावी या आंदोलनाची जय्यत तयारी सुरु आहे. सोलापूर मधील शेकडो मराठा बांधव सिद्धेश्वर एक्सप्रेस ने मुंबईला रवाना झाले आहेत.
मुंबईतील आझाद मैदानावर उद्या मराठा बांधवांचा एल्गार पाहायला मिळणार आहे. यासाठी गावागावातून मराठा बांधव एकवटले आहेत. काल मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे आणि हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज त्यांचा ताफा जुन्नरमध्ये दाखल झाला आहे. जुन्नर येथील वनविभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये विश्रांती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातून देखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे, तसेच सग्यासोयऱ्यांचा जीआर तात्काळ काढण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार केला आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
मुंबईकडे रवाना होणाऱ्या ताफ्यात हजारो वाहनांचाही समावेश आहे. जिल्हाभरातून जवळपास २५ हजार वाहने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यामध्ये मोटरसायकल, जीप, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप, ॲम्बुलन्स, पाण्याचे टँकर अशा विविध वाहनांचा समावेश आहे. तर काही जण सिद्धेश्वर एक्सप्रेस ने रवाना झाले आहेत.
मराठा समाजाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला असला तरी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा मराठा नेत्यांनी दिला आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यभरात मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरून आंदोलनं केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या या भव्य मेळाव्याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.