रूपेश पाटील, पालघर, साम टीव्ही प्रतिनिधी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात हळूहळू कडाक्याची थंडी वाढत आहे. एकीकडे तापमानाचा पारा घसरत असतानाच दुसरीकडे मात्र राजकारणाचा पारा वाढल्याचं चित्र आहे. पालघरमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक आमनेसआमने आले. पैसे वाटपावरून पालघरमध्ये जोरदार राडा झाला. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलं. पोलिसांनी एक गाडी ताब्यात घेतली असून चौकशी सुरु आहे.
पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे व ठाकरे गटात जोरदार राडा झाला. शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. पालघरमधील विष्णूनगर भागात वर्धमान संकुलातील घटना घडली. शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. परिसरात जोरदार गोंधळ झाल्याचं समजताच पोलीस घटनास्थळी पोहचले, अन् वातावरण शांत केलं. पोलिसांनी एक कार ताब्यात घेतली.
शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोप
पालघर शहरातील विष्णू नगर परिसरामध्ये उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटांच्या कार्यक्रमांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. प्रचार संपल्यानंतर देखील शिंदे गटाचे नगरसेवक सोसायटीमध्ये जाऊन प्रचार आणि पैसे वाटप करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. दरम्यान काही काळ या भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.शिंदे गटाचे माजी नगरसेवक बंड्या म्हात्रे आणि अमोल पाटील हे रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पालघरच्या विष्णुनगर परिसरातील वर्धमान सोसायटीमध्ये प्रचारासाठी गेले असता प्रचार करत असताना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर काही वेळातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तिथे जमा झाले दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली .
पोलिसांनी प्रकरण मिटवले
सदर घटनेनंतर तात्काळ पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर ठिकाणी एक कार पोलिसांना दिसून आली. त्या कारची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. कारची तपासणी केल्यानंतर त्या कारमध्ये कुठल्याही रित्या पैसे अथवा इतर वस्तू सापडले नसल्याने या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करून दोन्ही गटाला समज दिली आहे. प्रकरण आपापसात शांत करण्यात आलं असलं तरी त्याबाबत अधिक तपास पालघर पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.