Maharashtra politics, Uddhav Thackeray, Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार फुटल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ही राजकीय घडामोड ताजी असतानाच आता आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'ऑपरेशन टायगर' अजून सुरूच असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, ठाकरेंच्या शिवसेनेचे २० पैकी १४ आमदार संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होतील. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतील मविआच्या बैठकीला ६० आमदारांपैकी ३७ आमदारांनी दांडी मारली होती. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, 'ऑपरेशन टायगर ३.०' सुरू झाले असून शिवसेनेचे (यूबीटी) १४ आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होतील. या ऑपरेशनच्या दाव्याबाबत पाटील यांच्या विधानाला शिवसेनेचे दुसरे मंत्री उदय सामंत यांनी विरोध केला. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, असे कोणतेही ऑपरेशन सुरू नाही, मात्र मविआचे अनेक आमदार स्वतःहून शिवसेनेत सामील होण्यास इच्छुक आहेत.
थोडा वेळ थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे येतील. एकनाथ शिंदे बोलत नाहीत, ते फक्त आपल्या दाढीवरून हात फिरवतात, हे खुद्द उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी कबूल केले आहे. जेव्हा एकनाथ शिंदे आपल्या दाढीवरून हात फिरवतील, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होईल.- गुलाबराव पाटील
६ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ६ खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे नागपूरला गेले होते. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच त्याच विमानातून ठाकरे नागपूरला गेले. आज ठाकरेंच्या यवतमाळ-वाशिम येथील सभेला विदर्भातील चारही आमदार उपस्थित राहतील, असे सांगितले जातेय.
ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या २० आमदार आहेत. पक्षात फूट पाडण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा १४ आहे. या २० आमदारांपैकी १० आमदार शहरातील आहेत. त्यात उद्धव यांचा मुलगा आदित्य आणि भाचा वरुण सरदेसाई यांचा समावेश आहे. त्याशिवाय संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचाही समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.