मुंबई :खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर मुंबईच्या खार पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान राणा दाम्पत्यांनी दिलं होतं. त्यानंतर समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी तंसंच शांततेचा भंग झाल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे (Devendra fadnavis) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. आम्हीही हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणतोय, आमच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, असं थेट आव्हान फडणवीस यांनी दिलं. तसंच फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा पठण केली. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. फडणवीसांनी वाचलेल्या हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या आहेत. संपूर्ण हनुमान चालीसा माहित करुन घ्यायची असेल, तर राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात एकदा हजेरी लावून पूर्ण पाठ करुन घ्यावी. अशी विनंती अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलीय.
मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. भोंग्याच्या मुद्द्यावरून आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला राज्याच्या गृहमंत्र्यांनी निमंत्रण दिलं होतं. परंतु, ज्या काही घटना गेल्या चार-पाच दिवस मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारनं संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले. जर कोणी हिटलर प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल तर, संवादापेक्षा संघर्ष बरा, अशी मानसिकता झाल्यामुळं आम्ही या बैठकीवर बहिष्कार घातला आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुळातच विरोधी पक्षाला संपवण्याची अशा प्रकारची प्रवृत्ती सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर पोलिसांसमक्ष हल्ले करणार असतील, तसेच त्यानंतर एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर, अशा परिस्थितीत बैठकीला जाऊन फायदा काय? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच बघितली नाही. सरकारमधील पक्षाचे लोक पोलीस संरक्षणात विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून, जीवघेणा हल्ला करतात. पोलखोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आम्ही जनतेकडे मांडला. लोकशाहीत यापेक्षा वेगळं काय करायचं असतं. ज्यांना लोकशाही मान्य नाही. त्यांनी पोलखोल रथावर हल्ला केला. अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं बंद करू असं जर वाटत असेल तर हा गैरसमज मनातून काढून टाका. भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
Edited By- Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.