Saksham And Anchal Case  Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Case: आयुष्यभर सक्षमची बनून राहीन, आरोपींना फाशी द्या; आंचलने सांगितला प्रेमसंबंध ते हत्याकांडाचा घटनाक्रम

Saksham And Anchal Case: नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या तरूणाची मुलीच्या वडील आणि भावाने निर्घृण हत्या केली. या ऑनर किलिंग प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांना फाशी व्हावी अशी मागणी आंचलने केली.

Priya More

Summary -

  • प्रेम प्रकरणातून नांदेडमध्ये सक्षम ताटेची निर्घृण हत्या

  • आंचल मामीडवारच्या कुटुंबीयांकडून सक्षमची हत्या

  • आंचलने मृतदेहाशी लग्न करून सक्षमचीच राहणार असल्याचे सांगितले

  • आंचलच्या भाव आणि वडिलांना या प्रकरणात अटक

नांदेड संजय, सूर्यवंशी

विजातीय प्रेम प्रकरणातून नांदेडमध्ये सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होत. त्याच्या मृतदेहाशी लग्न करुन प्रेयसी आँचल मामीडवारने प्रेम निभावलं.सध्या हे प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. आंचल आणि सक्षम यांचे ३ वर्षांचे प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या प्रेमसंबंधाला आंचलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच रागातून आंचलच्या भावाने आणि वडिलांनी सक्षमवर आधी गोळीबार नंतर डोक्यात फरशी घालून निर्घृण हत्या केली. सक्षमसोबत लग्न करू नये यासाठी आंचलच्या कुटुंबीयांनी त्याला संपवलं. पण आंचलने त्याच्याच मृतदेहाशी लग्न करून तो नसला तरी आयुष्यभर त्याचीच बनून राहिल असा निर्धार केला. या प्रेम प्रकरणाची सुरुवातते सक्षमची हत्येचा थरार याचा संपूर्ण घटनाक्रम आंचल मामीडवारने साम टीव्हीशी बोलताना सांगितला.

सक्षमला मारून टाकण्याच्या धमक्या -

सक्षमसोबत भेट कशी झाली हे सांगताना आंचल म्हणाली, 'सक्षम आणि माझे दोन्ही भाऊ चांगले मित्र होते. सक्षम आमच्या घरी नेहमी यायचा त्यातून ३ वर्षांपूर्वी आमचे प्रेमसंबंध जुळले. तेव्हा सक्षम आणि मी दोघेही १६ ते १७ वर्षांचे होतो. वर्षभरापूर्वी माझ्या कुटुंबीयांना प्रेम प्रकरणाची माहिती झाली. तेव्हापासून वडील आणि भावांनी दबाव टाकला, धमक्या दिल्या, सक्षमविरोधात गुन्हा दाखल कर, तक्रार दे असा त्यांचा दबाव होता. गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही सक्षमला मारून टाकू किंवा स्वतः जीव देऊ अशा धमक्या ते देत होते. शस्त्रांचा धाक दाखवत होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी मी अल्पवयीन असताना सक्षमविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.'

सक्षम बापासारखं प्रेम करायचा -

सक्षमचं माझ्यावर खूप प्रेम होतं असं म्हणत आंचलने रडत रडत सांगितले. ती म्हणाली, 'मला १८ वर्षे पूर्ण होताच मी स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली आणि त्याच गुन्ह्यात सक्षमवर एमपीडीएची कारवाई झाली. तो गुन्हेगार नव्हता. पोलिस माझ्या वडिलांकडून पैसे घेऊन जात होते. माझे वडील आणि भावांनी दोन नंबरचे धंदे करून पैसे कमवले. ३ वर्षात मला खूप दबाव टाकला, खूप वेळा मारहाण करण्यात आली. सक्षमला मी सगळं सांगितलं. पळून जाऊ म्हणाले. पण तो बोलला तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो. त्यांना मनवून तुला न्यायचं असं सक्षम म्हणायचा. माझ्या प्रेमाच माहीत नाही, पण सक्षम माझ्यावर खूप प्रेम करायचा. बापासारखे त्याने माझ्यावरती प्रेम केलं.'

सक्षमची हत्या करायला पोलिसाने लावले -

आंचलने पोलिसावर गंभीर आरोप केला. ती म्हणाली, '२७ तारखेला घटनेच्या दिवशी सकाळी लहान भाऊ म्हणाला पोलिस स्टेशनला चल सक्षमवर गुन्हा दाखल कर. सक्षमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बळजबरी करत होता. मात्र मी तक्रार दिली नाही. सर्व पोलिसांसमोर सांगितलं मला सक्षमवर गुन्हा दाखल करायचा नाही. तेव्हा पोलिस कर्मचारी धीरज कोमलवार माझ्या लहान भावाला म्हणाले. रोज मारामाऱ्या करून इथे येतोस. तुझ्या बहिणीचे लफडं ज्याच्यासोबत आहे त्याला मारून ये, असं बोलून त्या कर्मचाऱ्याने माझ्या भावाला भडकवलं. माझा भाऊ बोलला त्याला मारूनच इथे येतो.'

सक्षमची हत्या झाली त्यादिवशी आंचल कुठे होती?

सक्षमची हत्या करण्यात आली त्यादिवशी काय झालं? याबद्दल आंचल म्हणाली, 'त्या दिवशी संध्याकाळी मला सांगितलं देव दर्शनाला जायचं. मला घेऊन परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आईच्या माहेरी नेले. त्यावेळी वडील आणि दोन भाऊ सोबत नव्हते. आई आणि काका काकू होते. आम्ही मानवतला थांबलो. तिथे पोलिस आले आणि तिथे दोन्हीं भाऊ आणि वडील पण होते. मला आश्चर्य वाटलं दोन्ही भाऊ आणि वडील का आले? मला सांगितलं सक्षमला दोन तीन टाके लागले, रुग्णालयात आहे. तिथून पोलिसांनी नांदेडला आणलं. पोलिसांनी सुद्धा काहीच सांगितलं नाही. पोलिस स्थानकात सकाळी सक्षमचा मयत असलेला फोटो पाहिला. तेव्हा मला कळाले सक्षमची हत्या झाली.', असे आंचलने सांगितले.

शेवटपर्यंत ठाम राहीन -

सक्षम नसला तरी मी आयुष्यभर त्याचीच राहीन असं म्हणत आंचलने सांगितले की, 'त्याला सगळे जण म्हणायचे मी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्या मुलीचा नाद सोड. पण त्याने मला खूप जीव लावला. मग मी त्याची साथ कशी सोडू. आताही त्याची साथ सोडणार नाही. तो नाही पण तरी त्याची साथ सोडणार नाही. मी त्याच्यासोबत आहे. त्याच्या परिवारासोबत आहे. माझ्यामुळे, माझ्या प्रेमामुळे त्यांचा मुलगा गेला आता मी त्यांची साथ नाही सोडू शकत. मला माझ्या प्रेमाची शपथ शेवटपर्यंत ठाम राहील. पोलिसांनी अटक केल्यानंतर माझे वडील मला भावनिक आवाहन करत होते. माझा भाऊ हिमेशने मला धमकी दिली.'

सक्षमच्या कुटुंबीयांना सुरक्षा द्या -

'मला माझ्या जीवाची भीती नाही. मी ज्यासाठी जगत होते तोच राहिला नाही. मला भीती नाही पण सक्षमच्या परिवाराला सुरक्षा द्या. त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन आहे. तो सुटून येईल. तो बोलला होता १५ ते २० दिवसांत सुटून येईल. सक्षमच्या परिवाराला सोडणार नाही. त्यामुळे सक्षमच्या परिवाराला सुरक्षा द्या. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. फाशी झाली पाहिजे. घरच्यांनी सांगितलं आता घरात पाऊल ठेवायचं नाही. मी पण त्यांच्या घरी जाणार नाही इथेच राहणार.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Ladki Bahin Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

Green Chilli Fry Recipe : जेवणासोबत तोंडी लावायला ही तिखट मिरची फ्राय एकदा करुनच बघा, वाचा रेसिपी

Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांचे बालेकिल्ले ढासळले, ११ ठिकाणी भाजपचा दारुण पराभव; कोणत्या नेत्यांना फटका बसला?

SCROLL FOR NEXT