पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूरमध्ये रस्ते अपघातात राष्ट्रीय खेळाडू अवनी मुकेश बघेल (वय 17) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत अवनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी दुचाकीस्वाराला पोलिसांनी सोडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांसह खेळाडूंनी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली थेट डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन केले. विशेष म्हणजे, न्यायाच्या मागणीसाठी अवनीचा पार्थिव देहही रुग्णवाहिकेतून डीसीपी कार्यालयासमोर आणण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील संघर्षनगर चौकात 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत 17 वर्षीय अवनी मुकेश बघेल हिचा मृत्यू झाला. अवनी ही सेपक टकरा या खेळातील राष्ट्रीय स्तराची खेळाडू होती. तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व करत 7 ते 8 वेळा पदके मिळवली होती. तसेच महाराष्ट्राकडून 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत सुवर्णपदकांना ही गवसणी घातली होती. खेलो इंडिया स्पर्धेतही तिने आपल्या खेळाची छाप पाडली होती.
अवनीचा राष्ट्रीय खेळाडू होण्यापर्यंतचा प्रवास संघर्षमय होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला खेळासाठी आवश्यक शूज घेणेही कठीण होते. मात्र, अवनीने हार न मानता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली. तिच्या क्रीडा अॅकाडमी प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंनीही तिला वेळोवेळी मदत केली होती. मात्र, एका अपघातामुळे तिच्या क्रीडा कारकिर्दीचा दुर्दैवी अंत झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, अवनीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी आरोपीला रात्री ताब्यात घेतल्यानंतर पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास सोडून दिले. सकाळी ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी नगरसेवक वसीम खान यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खान यांनी नंदनवन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संबंधित व्यक्तीला सूचना पत्र देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.