फय्याज शेख
मुरबाड (ठाणे) : मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य अशा माळशेज घाटातील धबधब्याखाली मौजमजा करणे म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. परंतू मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडून काही अपघात होऊ नये; यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश काढला आहे. तरीही पर्यटक या आदेशाला केराची टोपली दाखवून विनादिक्कत धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.
मुरबाड तालुक्यातील आदिवासी दुर्गम भाग असलेल्या कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाट (Malshej Ghat) हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून महामार्गालगतच पांढरे शुभ्र फेसाळलेल्या धबधब्यांची पर्वणी पर्यटकांना खुणावत असते. या पर्वणीचा मनमुराद लाभ घेण्यासाठी मुंबई, (Thane) ठाणे, कल्याण, पुणे, रायगड जिल्ह्यातील हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. यावेळी येथील कायदा व सुव्यवस्था ही तालुक्यातील टोकावडे पोलिस व महामार्ग पोलीस पहात असतात. परंतु माळशेज घाटातील दगड हा ठिसुळ झाल्याने अनेकवेळा दरडी कोसळतात. प्रसंगी दुर्घटना घडून जीवितहानी सुद्धा झाली आहे.
या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मनाई आदेश काढून या ठिकाणी पर्यटकांना धबधब्याखाली भिजण्यासाठी मज्जाव केला आहे. तरी सुध्दा शेकडो पर्यटक या आदेशाकडे दुर्लक्ष करत विनादिक्कत धबधब्याखाली मनमुराद भिजण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. सुट्टीचा दिवस किंवा शनिवार- रविवारी तर धबधब्यांसमोर महामार्गावर गाड्या लावायला सुध्दा जागा नसते. मात्र प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशाला गुंडाळून बाजूला ठेवले आहे. या आविर्भावात पर्यटक आपली मौजमजा करताना दिसतात. यामुळे पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून येथे केव्हाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.