मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई मोर्चाबाबत मोठा निर्णय
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची जरांगेंची तयारी
मोर्चाचा मार्ग ठरवण्यासाठी उद्या अंतरवाली सराटीत बैठक
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईला येण्याचा निर्धार केला आहे. सरकार मागण्या मान्य करत नसल्यामुळे त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला असून मराठा बांधवांना मुंबईला जाण्यासाठी तयार राहा असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये दुपारी १२ वाजता बैठक ठेवली आहे. या बैठकीला वेळात वेळ काढून यावे असे देखील त्यांनी सर्वांना सांगितले. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा देखील दिला. 'मुंबईत गेल्याशिवाय न्याय मिळत नाही. सरकारला भरपूर वेळ दिला पण सरकारने ऐकलं नाही. मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. परवानगी मिळो अथवा ना मिळो पण मुंबईत जाणार.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा आज १४ वा दिवस आहे. सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही त्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधत मुंबईला जाण्यासाठी तयारीला लागा असे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, 'सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आपल्याला मुंबईला जाणचं आहे. मुंबईला जाणाऱ्या वाटेवर येऊन थांबा. जो मार्ग ठरेल त्याच मार्गाने मुंबईला जायचं. ज्यांना पैशाच्या अडचणी असतील त्यांनी येऊ नका त्यांनी आम्हाला शांततेत गावातच पाठिंबा द्यावा. समाजाची हार होऊ देऊ नका. मुंबईत येऊ शकत नाही त्यांनी इथूनच पाठिंबा द्या.'
मोर्चाचा मार्ग कसा असेल हे उद्याच्या बैठकीत ठरणार आहे. या बैठकीबाबत मनोज जरांगे यांनी सांगितले की, 'मुंबईत गेल्यावर आम्हाला त्रास झाला तर तालुक्याच्या ठिकाणी येऊन लोकांनी एकत्र येऊन ठिय्या मांडून बसायचं. मुंबईत मराठ्यांना त्रास झाला तर गावोगावी शांततेत रास्तारोको करा. पैशांची अडचण असेल तर येऊ नका. आता अटीतटीचा सामना आहे. उद्या दुपारी १२ वाजता आंतरवालीत बैठक आहे. उद्याच्या बैठकीला या, मराठ्यांची हार होऊ देऊ नका. बैठकीला कुणीही गैरहजर राहू नका. एक दिवस समाजासाठी द्या. उद्याची बैठक घरात बसून टीव्हीवर बघू नका तर स्वत: उपस्थित राहा. अंतिम टप्प्यात लढाई आली आहे.त्यामुळं सगळ्यांनी बैठकीला उपस्थित रहावं.'
मराठा समाजावर अन्याय झाला असल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'जे संकट येईत ते स्वीकारण्याची तयारी मी केली आहे. मी मुंबईत जाणार. मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही. सरकारला भरपूर वेळ दिला पण सरकारने ऐकलं नाही. मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. परवानगी मिळो अथवा ना मिळो मुंबईत जाणार. आम्ही कायद्याला मानणारे असल्याने अर्ज केला आहे. सरकारने न्याय दिला नाही तर न्यायदेवता न्याय देईल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.