योगेश काशीद, साम टीव्ही
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या व्यवहारावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, हा व्यवहार खोटा ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास पुराव्यांचा आणखी मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 500 कोटींच्या आरोपानंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मनोज जरांगे यांना जे प्रश्न पडले आहेत, तेच प्रश्न आपल्यालाही पडले असून, या प्रकरणाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्यांच्या या प्रतिक्रियेवर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
500 कोटींच्या व्यवहाराचे प्रकरण लहान नसून, ते सहजतेने घेऊन चालणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही या प्रकरणाला खोटे ठरवत असाल तर जनतेचा तुमच्यावरील विश्वास उडेल. सत्य समोर असतानाही ते स्वीकारले जात नसेल, तर सत्तेची मस्ती आणि धुंदी आली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात आपले लोक असले, तरी त्यांना सोडले जाणार नाही असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला पाहिजे, अशी मागणीही जरांगे यांनी केली. या प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांची विश्वासर्हता कमी होऊ नये, यासाठी सत्य समोर आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
या व्यवहारामागे मोठे षड्यंत्र आणि कट असल्याचा आरोप करत, पडद्यामागून हे सर्व घडवणारे लोक कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले. संबंधितांनी पैसे दिलेच नसतील, तर त्यांनी गप्प का बसावे? तसेच, पैसे घेतले नसतील, तर दुसऱ्या बाजूनेही गप्प का बसावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा आता वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय झाला असून, हा डाग कोणी आणि का लावला, हे शोधले पाहिजे. या प्रकरणात कोणालाही सोडले जाऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या ऑडिओ क्लिपच्या संदर्भात फॉरेन्सिक चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असताना, त्यातून सत्य समोर येईल, अशी अपेक्षा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. मात्र, दिल्लीवारी सुरू असल्याने जवळच्या लोकांना वाचवले जाणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 500 कोटींच्या व्यवहाराबाबत सत्य समोर आले पाहिजे. हा व्यवहार खरा असताना तो खोटा ठरवण्याचा प्रयत्न झाला, तर मराठ्यांसोबत तुमचा सामना असेल. यानंतर पुराव्यांचा आणखी मोठा अणुबॉम्ब फोडेन आणि सगळे बाहेर येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.