अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी
Manoj Jarange On Eknath Shinde Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर अत्यंत खळबळजनक वक्तव्ये केली आहेत. नवनाथ बन यांच्या व्हायरल क्लिपवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी, "हे कोणतंही AI नाही, तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील एक मोठा गेम प्लॅन आहे," असा थेट दावा केला आहे.
'शिंदेंना संपवण्याचा डाव, फडणवीसांचाही गेम!'
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "ही क्लिप AI द्वारे तयार करण्यात आलेली नाही. शिंदे साहेबांवर हा वैयक्तिक घाव घातला गेला असून त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा हा डाव होता का? याचा विचार केला पाहिजे. मला काल मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून हा सगळा प्रकार घडवून आणला गेला आहे. फडणवीस साहेब जर याच्या मुळाशी गेले, तर त्यांच्याही विरोधात हा एक मोठा गेम होता हे त्यांच्या लक्षात येईल."
त्यांनी पुढे सवाल केला की, "या क्लिपमध्ये बोलणारे लोक नेमके कोणाचे आहेत? ही कोणती यंत्रणा आहे आणि यांच्या पाठीवर कोणाचा हात आहे? जर शिंदे आणि फडणवीस यांनी याचा शोध घेतला नाही, तर या सगळ्यात फडणवीस यांचाच हात होता का, असा संशय लोकांना येईल."
'मागे दिल्लीतील बडा नेता अन् भाजपपेक्षा मोठी संस्था?'
या कटाच्या मागे राष्ट्रीय पातळीवरील शक्ती असू शकतात असा संशय व्यक्त करत जरांगे म्हणाले, "या बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील एखादा बडा नेता असला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची शिंदे आणि फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी. या लोकांच्या पाठीशी दिल्लीतून हात असण्याची दाट शक्यता असून भाजपपेक्षाही मोठी संस्था यामागे असावी." तसेच, माझ्या विरोधात बोलणाऱ्या सर्वांना नोटा वाटल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊत यांच्या ईडी चौकशीच्या मागणीवर काय म्हणाले?
"सध्या आतली खदखद खूप डेंजर आहे. आम्हाला दोन्ही गटातील माहिती मिळत असते. सत्ताधारी असो वा विरोधक, सगळेच लोक येत्या काळात उठाव करणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करताना कोणत्याही दबाव आणणाऱ्या यंत्रणांचा वापर न करता निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे." सत्तेच्या बाहेर जाऊन जेलमध्ये जाण्याची भीती असल्याने त्यांना आता सहनच करावे लागेल. ते काहीही बोलले तरी मी आता शांत बसणार नाही, मी या लोकांच्या मागे लागणार आहे, असा इशारा संजय शिरसाट यांना दिला.
रामदास कदम यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले की, रामदास भाई बोलले त्याला प्रखर भूमिका म्हणत नाहीत. हे लोक जे षडयंत्र रचत होते, ते आम्ही बाहेर काढले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांचे आभार मानले पाहिजेत.
'आरक्षणात अंगावर घेऊ, पण या प्रकरणात शिंदेंच्या पाठीशी!'
एकनाथ शिंदे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील म्हणाले, "या विशिष्ट प्रकरणात शिंदे साहेबांसाठी जी किंमत मोजायची वेळ येईल, ती मोजायला आम्ही तयार आहोत. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना अंगावरच घेऊ. मराठ्यांचे आंदोलन चिरडायला निघालेल्या लोकांचे खोटे दाखवून त्यावर पांघरुण घालता येणार नाही. आवश्यकता भासल्यास आम्ही फडणवीस साहेबांनाही मदत करू," असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.