Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् महायुतीला तडा; भाजप-शिंदेसेनेचं बिनसलं; नेमकं कोण खेळतंय 'गेम'?

Manoj Jarange Audio Clip : मनोज जरांगे यांच्या कथित ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात राजकीय वाद चिघळला आहे. एकनाथ शिंदे यांनी पैसे दिले किंवा घेतले नसल्याचे स्पष्ट केले, तर रामदास कदम यांनी भाजपवर कटाचा आरोप केला.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange alleged ₹500 crore audio clip controversy explained : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेल्या कथित 'ऑडिओ बॉम्ब'मुळे महायुतीत मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. २९ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटींच्या आर्थिक व्यवहारांचा उल्लेख असून भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची नावे असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणानंतर भाजप आणि शिंदे सेनेचे नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. मित्रपक्षांमधील या थेट संघर्षामुळे महायुतीमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपचे नेमके सत्य काय? हे शोधण्यासाठी या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा हातात घेतला. त्याशिवाय शिंदेसेनेकडून थेट गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात आले. भाजपमधील काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर संशय याद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. जरांगेंनी टाकलेला हा 'बॉम्ब' फुटला खरा, पण तो फुसका निघणार की याच्या आवाजाने महायुतीला मोठा तडा जाणार, हे येणारा काळच ठरवेल. सध्या तरी या ५०० कोटींच्या ऑडिओ प्रकरणामुळे शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली असून, महायुतीचे अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा नेमका दावा काय?

दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींच्या व्यवहाराचा गंभीर केला होता. 'तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले, अशी चर्चा भाजप नेत्यांमध्ये आहे. भाजपकडून माझ्या नावाने एकनाथ शिंदेंनी पैसे घेतले आहेत का? घेतले असतील तर मला दिले आहेत का? त्याबाबत उत्तर द्या', असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी पोहोचले आहेत, असं तुम्ही भाजपच्या नेत्यांना बोलले का? असेही जरांगे म्हणाले होते.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय ?-

त्यानंतर मनोज जरांगे यांनी एका पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप (कॉल रेकॉर्डिंग) ऐकवली. या क्लिपमध्ये काही व्यक्ती आपापसात बोलत असून, त्यातील एका महिलेचा आवाज असल्याचे सांगण्यात आले. त्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा केली जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला.

आपल्यावर होणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या आरोपांबाबत आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे, हे समोर आणण्यासाठीच आपण हा 'ऑडिओ बॉम्ब' पुरावादाखल समोर आणला असल्याचे जरांगे यांनी म्हटले. तसेच, या ५०० कोटींच्या कथित व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

ऑडिओ क्लिपमध्ये कोण कोणत्या भाजप नेत्याची नावे?

भाजपचे नेते आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नावांचाही उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या चर्चेत सहभागी असलेल्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख अतुल, निखिल, श्वेताजी, गिरीष, अजयजी, जितेनभाई, सुशीलकुमार पावरा असा केलेला आहे.

ती ऑडिओ क्लिप एआय आहे का?

मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप सादर करत भाजप आणि शिंदेंसेनेवर आरोप केले. भाजप तुम्हाला संपवतेय की मला संपवत आहे.. असा सवाल त्यांनी केला होता. यावर भाजपच्य काही नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या. ही ऑडिओ क्लिपची पडताळणी झाली पाहिजे. ही एआय असेल, असा दावा करण्यात आला. पण आज मनोज जरांगे पाटील आणि रामदास कदम यांनी आपल्या पत्रकार परिषदेत ही क्लिक एआय नसल्याचा दावा केला.

महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी हा दावा खोडून काढत हा भाजपचाच कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्याशिवाय रामदास कदम यांनी जरांगे यांचं भाजप कनेक्शन असल्याचा आरोप केला. भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांचा जेवण करतानाचा फोटो दाखवला. त्याशिवाय भाजप शिंदेंना बदनाम करत असल्याचा आरोप केला.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ?

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपावर शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ५०० कोटी दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी जरांगेंनी त्याची शहानिशा करायला हवी होती. त्यांच्याकडे पुरावे असतील तर संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे, असे एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. जरांगे यांनी मराठा समाजाचे काम करावे; त्याला राजकीय व्यासपीठ बनवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

मनोज जरांगेंच्या कथित ५०० कोटींच्या आरोपानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन युतीमधील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्येच शा‍ब्दिक चकमक सुरू झाली. रामदास कदम यांनी या प्रकरणात थेट भाजपचा कट असल्याचा आरोप केला. शिंदेंना संपवण्यासाठी भाजपमधून कुणी विडा उचलला आहे? त्याची चौकशी व्हायला हवी, असे कदम म्हणाले. त्यावर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले. रामदास कदम यांनी संजय राऊतांसारखे वागू नये, असा टोला लगावला. या ऑडिओ क्लिपमध्ये विरोधकांचा डाव असल्याचं भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले. तर प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणात भाजपला दोष देणं योग्य नाही, खपवून घेतले जाणार नाही. आपण सत्तेत असताना अशी वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं म्हणत दरेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेला इशारा दिला. पडद्याआडून जरांगेंने मदत करणारे कोण होते? असा सवाल त्यांनी रामदास कदम यांना विचारला.

विरोधक काय म्हणाले ?

विरोधकांनी एकत्रितपणे या ५०० कोटींच्या कथित व्यवहाराची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी (SIT) करण्याची मागणी लावून धरली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून महायुतीला धारेवर धरत, हा जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मराठा आंदोलन दडपण्यासाठीच महायुतीकडून हे प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे, राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत यावर टीकास्त्र सोडत, "हे यांच्याच सरकारमधले नेहमीप्रमाणे 'शहा-काट शहा'चे राजकारण आहे," अशा शब्दांत महायुतीवर जोरदार निशाणा साधला. महायुतीचे नेते एकमेकांवर आणि आंदोलकांवर चिखलफेक करून मूळ प्रश्नांवरून (मराठा आरक्षण व शेतकरी समस्या) जनतेचे लक्ष भरकटवत आहेत, असा थेट आरोप विरोधकांनी केला आहे.

एकिकडे जरांगे-पाटील यांनी या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून थेट आरोप केले आहेत, तर दुसरीकडे या ऑडिओ कनेक्शनमुळे शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. या तणावाचा शेवट नेमका काय होणार? कथित ऑडिओ क्लिपचे सत्य समोर येणार का? जरांगेंच्या ५०० कोटींच्या आरोपांचे काय होणार आणि या ५०० कोटींचा खरा सूत्रधार नेमका कोण? या सर्व प्रश्नांवर सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या महायुतीत मोठी दुफळी पडल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक पेठ रस्त्यावर उमराळे गावाजवळभीषण अपघात

हा तर शहा-काट 'शाहाचं' खेळ!" ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राज ठाकरेंचा थेट निशाणा

Uric Acid Symptoms: शरीरात युरिक ॲसिड वाढल्याची सुरुवातीची ७ लक्षणं; याकडे दुर्लक्ष करणं पडेल भारी

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीआधीच खात्यात ₹२,००० जमा होणार, सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर

ड्रायव्हिंग लायसन्सचा नियम बदलला! पास होण्यासाठी ६० नव्हे तर ७५% गुण पाडावेच लागणार, केंद्र सरकारचा मोठा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT