Maharashtra Weater राज्यातील विविध भागात रोज पडत असलेल्या अवकाळी पावसाने आज देखील जोरदार हजेरी लावली. काही भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी कडक उन्हाचे चटके जाणवत होते. असे असताना दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवड शहर परिसरासह, वाशीम, रिसोड, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तसेच नाशिकच्या निफाडमध्ये जोरदार पाऊस झाला.
रिसोडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग
वाशिममध्ये आज दुपारी वातावरणात बदल होत अनेक भागात पाऊस झाला. मात्र, रिसोड शहरात अवकाळी पावसाची मुसळधार बॅटिंग बघायला मिळाली आहे. साधारण अर्ध्या तास रिसोड शहरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून वाशिम शहरातही पाऊस पडल्याने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. मागील तीन- चार दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. तर जिल्ह्यात हवामान खात्याने २० तारखेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी तुफान पाऊस
राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. मागील आठ दिवसांपासून येत असलेल्या पावसाने आज नवव्या दिवशी देखील जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकडदा परिसरात देखील पावसाची धुवाधार बॅटिंग पाहण्यास मिळाली. सातपुडा परिसरात एका तासांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस असल्याने सातपुड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्येही जोरदार हजेरी
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागात आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यात काही ठिकाणी पुढील २४ तासात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यातच आज दुपारी दोन वाजता दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारबळ उडाली आहे.
निफाड तालुक्यात जोरदार पाऊस
नाशिक जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज दुपारच्या सुमारास निफाड तालुक्यातील नांदूर-माध्यमेशवर, चापडगाव, मांजरे, शिंगवे या गावात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचले असून दुपारनंतर पडणाऱ्या पावसामुळे मात्र शेतकऱ्याच्या पिकांना त्याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आगामी खरीप हंगामातील पूर्वतयारीला प्रारंभ
धुळे जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस होत आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील गावांमध्ये आगामी खरीप हंगामातील पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. कापूस लागवडीसाठी शेत मशागतीच्या कामांना वेग आला आहे. तर तापमानाचा पारा घसरल्यामुळे तसेच अमरावती मध्यम प्रकल्पातील मुबलक पाणी साठ्यामुळे बागायती कापसाची लागवड यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्याचे नियोजन येथील शेतकऱ्यांचे असल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.