अँकर : गडचिरोली जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आला असून दोघेजण पुरात वाहून गेल्याची घटना धानोरा तालुक्यातील कारवाफा आणि भामरागड तालुक्यात घडली आहे. तर सततच्या पावसाने कुरखेडा येथील दोन घरांची पडझड झाली असून येथील रहिवासी पुरुषोत्तम तुलावी व नर्मदा डेकाटे यांचे छत हिरावले आहे. पुरामुळे नुकसान झालेल्यांना प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुरी शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. ब्रम्हपुरी व आसपास सुमारे एक तास मुसळधार पाऊस बरसला. यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. पावसामुळे शेषनगर, विद्यानगर, रविदास चौक, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक, पटेलनगर, डॉ.गणवीर हॉस्पिटल आदी भागातील रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील ६० दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहे.
हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये २०० ते ३०० फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर भारतीय दंड. संहिता १९०८ कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि वन अधिनियमातील अनुषंगिक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
रायगड मध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस, सलग ८ दिवस १५० ते २०० मिमी पाऊस होत आहे. रेड अलर्ट पाहता आधीच हवामान विभागाने दरडी कोसळणे आणि भूस्खलन होणे याचा अलर्ट दिला होता. आता पुढील दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. बंगाल महासागरात निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर पुन्हा रेड आणि ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील धोकेदायक काझी गढीची महापालिका प्रशासनाकडून पाहणी
इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर
धोकेदायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या हालचाली
पालिका प्रशासनाकडून यापूर्वीच दिल्यात काझी गढीवरील रहिवाशांना नोटिसा
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीत नागरिकांना घर खाली करण्याच्या केल्या सूचना
जीव महत्वाचा असल्यानं नागरिकांची समाजमंदिर अथवा शाळेत तात्पुरती सोय करण्याची शक्यता
यापूर्वी अनेकदा काझी गढीचा काही भाग कोसळल्याच्या घडल्यात घटना
प्रत्यक्ष पाहणीनंतर पालिका प्रशासनाकडून आता पुढील कारवाई केली जाणार
अकोल्याच्या अर्नाळा गावातील आदिवासी पाडा संपूर्ण पाण्यात बुडला आहे. गेल्या तीन दिवसापासून ह्या पाड्यांमध्ये पाणी भरलं आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पाणी निघण्यासारखा मार्ग असून देखील ग्रामपंचायत पाणी काढत नाही.
गेल्या 24 तासापासून आम्ही जेसीबी आणतो आणि पाणी काढतो असे आश्वासन दिले जातात. गावातला पाणी अजूनही काढण्याचा मार्ग सुरू केलेला नसल्यामुळे अखेर संतप्त गावकऱ्यांनी थेट पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले आहे. याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप लाल बावटा पक्षाचे कॉम्रेड शुरू वाघ यांनी केले आहे.
कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाट परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसाने महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. सध्या या परिसरातील धबधबे हे ओसांडून वाहत असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने अनेक वाहनेही माळशेज घाट परिसरात अडकून पडली आहे.
मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यात आक्सापूर येथील तलाव फुटला. यामुळे लगतची शेती जलमय झाली आहे. बाजूलाच असलेले बोरगावही प्रभावित झाले आहे. तलावाच्या पाण्याने बोर्गावला वेढले असून येथील शेतीसुद्धा पाण्याखाली आहे. प्रशासनाची टीम गावात पोचली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वित्तहानीची आकडेवारी अजून समोर आलेली नाही.
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा पहिला बळी गेला आहे. औंढा राज्य महामार्गावरून वाहणाऱ्या हिवरा गावाजवळ मधोमधी नदीच्या पात्रात एका साठ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह पाण्यात वाहून आला आहे. ग्रामस्थांनी याची माहिती हिंगोलीच्या ग्रामीण पोलिसांना दिली असून पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हा व्यक्ती कोणत्या गावचा आहे व त्याचं नाव काय याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या पाणी पातळीत मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे वाढ झाली आहे.बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार धरणामध्ये 57टक्के एवढा पाणीसाठा असल्याचे समोर आले. येलदरी धरण परिसरात मंगळवारी 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. मागील 24 तासात धरण क्षेत्रामध्ये 13.776 दलघमी पाण्याची आवक झाली. येलदरी धरण परिसरात तसेच गावाच्या परिसरात मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाला. एका दिवसात धरणाच्या पाणी पातळीत तब्बल दोन टक्के साठा वाढला आहे.
सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू झल्याने कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. चांदोली धरण क्षेत्रात तर अतिवृष्टी झाली असून चांदोली धरण परिसरात चोवीस तासांत ६७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहु लागली आहे. दुसरीकडे सांगलीजवळील कृष्णा नदीतील पाणी पातळी देखील आता वाढू लागली आहे.
इर्शालगडावर बचाव कार्य करताना अनेक अडचणी येत आहेत. या ठिकाणी जेसीबी, पोकलेन किंवा अन्य कोणतीही यंत्रणा या ठिकाणी पोहचू शकत नसल्याने NDRFचे जवान आणि स्थानिक खोरे, कुदळ यांच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी हेलिकाॅप्टरद्वारे बचावकार्य राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
मावळात धो धो मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना नदी, इंद्रायणी नदी दुथडी वाहत आहे. अशावेळी कोणतीही दुर्घटना घडली तर कोणती उपाययोजना करण्याची याबद्दलचे प्रात्यक्षिक आपातकालीन विभाग यांच्या वतीने तळेगावमध्ये घेण्यात आले. यामध्ये ग्राम सुरक्षा दल, वन्यजीवन रक्षक, मावळ संस्था, यानी सहभाग घेतला होता. एखादी व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे प्रशिक्षणही देण्यात आली.
रायगडमधील इर्शाळवाडी जवळ दरड कोसळून एक भीषण दुर्घटना घडली. दरड कोसळण्याची ही घटना अतिशय भीषण असून यामध्ये अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत.
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी (19 जुलै) रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर इथं दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये नेमके नुकसान किती झाले आहे, ढिगाऱ्याखाली किती जण अडकले आहेत याबाबत प्रशासनाच्यावतीने अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात पुढील पाच दिवस फार महत्वाचे ठरणार आहे. हवामान खात्याने पुणे, रायगड, पालघर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील ३ दिवस मुंबईत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, कोकणातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.