सुनेत्रा पवार पुण्यात आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेणार
बैठकीत विलीनीकरणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांकडे
अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह अख्ख्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यावेळी प्रसंगावधान बाळगत सुनेत्रा पवार यांनी स्वत: ला दु:खातून सावरत पक्षाची धुरा आपल्या घेतली आणि कामाला लागल्या.
अगदी अजितदादांप्रमाणे त्यांनी कामाचा धडाका लावलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनियुक्त सदस्यांच्या बैठक घेतल्यानंतर आता त्या मंगळवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती आणि विलीनीकरणावर चर्चा होणार आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची दोन्ही शकले एक होणार की नाही याचा निर्णय लागण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय. शरद पवार गटाच्या नेत्यांकडून आणि अजित पवार गटातील काही आमदारांनीही विलीनीकरणाची इ्च्छा व्यक्त केलीय. त्याचदरम्यान पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा, विलीनीकरण, आमदारांच्या समस्या, रखडलेली कामं, प्रस्तावित प्रकल्पांची कामं आणि निधी याविषयी चर्चा होणार आहे.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचा. गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणाची चर्चांनी वेग धरलाय. त्यामुळे पुण्याच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अजितदादांप्रमाणेच त्यांनी कामाचा सपाटा लावलाय.
पुण्यासह बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत सुनेत्रा पवारांनी जिल्ह्यात सुरु असणारे प्रकल्प दर्जेदार पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. त्या बीड जिल्ह्याचा देखील दौरा करणार आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यावर त्या पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर जाणार आहेत. येथील महा पशुधन एक्स्पोला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं पहिलं पाऊल पु्ण्यात पडलंय. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनकेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच आपण अमोल कोल्हेंसोबत एकत्रित वाटचाल करणार असल्याचं जाहीर केले. दुसरीकडे तटकरेंनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतलीय.
येत्या 15 दिवसांत राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासूनच पुण्यातील सर्किट हाऊस येथे आहेत. येथे त्यांनी बैठकांचा धडाका लावलाय. सर्वानुमते उपमुख्यंत्री सुनेत्रा पवार यांचीच निवड राष्ट्रीय अध्यक्षपदी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.