ram shinde And mla rohit pawar saam tv
महाराष्ट्र

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Priya More

सुशील थोरात, अहमदनगर

अहनदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघ हा गेल्या ५ वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेचा मतदारसंघ राहिला आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार यांनी निवडणूक लढवली होती. रोहित पवार हे बारामतीवरून थेट कर्जत-जामखेड मतदारसंघात येऊन निवडणूक लढवून त्यांनी ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती. तर सलग तीन वेळा आमदार राहिलेले भाजपचे तात्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता आमदार राम शिंदे हे विधान परिषदेवर निवडून गेले असले तरी पुन्हा एकदा ते विधानसभेमध्ये आपले नशीब आजमवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्यासह आमदार राम शिंदे यांनी निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे.

या मतदारसंघात सध्या तरी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध असणारा आणि सध्या एक नव्हे तर दोन आमदार असणारा आणि आता प्रगतीच्या दिशेने धावणारा कर्जत जामखेड मतदारसंघात थंडीत वातावरण चांगलेच तापणार आहे. कर्जत जामखेड विधानसभेत मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस असणार आहे.भूमिपुत्र आणि बाहेरचा या आरोप प्रत्यारोपाने जामखेड कर्जत मतदारसंघात वातावरण तापले आहे. विद्यमान आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तर विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आमदारांपैकी एक आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ हा राज्याच्या लक्ष वेधून घेणारा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ३ लाख ४७ हजार मतदार संख्या आहे. या मतदारसंघावर रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती मतं मिळाली -

रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)

मतं- १३५,८२४ आघाडी ४३,३४७

मतांचा वाटा ५६.९८ टक्के

राम शंकर शिंदे, भारतीय जनता पक्ष (भाजप)

मतं - ९२,४७७

मतांचा वाटा - ३८.८० टक्के

२०२४ मधील कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे -

- आमदार रोहित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

- राम शिंदे - भारतीय जनता पार्टी

- अरुण हौसराव जाधव (वंचित बहुजन आघाडी )

- परिवर्तन महाआघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

- जरांगे पाटील यांचाही या ठिकाणी उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार हे विद्यमान आमदार असून या मतदारसंघातून अद्यापही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून कुणीही उमेदवारीबाबत दावा केला नाही. मधल्या काळात काँग्रेसने हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी मांडली होती. मात्र कालांतराने काँग्रेस पक्ष ही शांत झाल्याचं समोर येत आहे. सध्या तरी विद्यमान आमदार रोहित पवार यांचे तिकीट फिक्स असल्याचे मानले जात आहे. तर विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भारतीय जनता पार्टीने त्यांना विधान परिषदेवर घेऊन रोहित पवारांना एक शह दिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी तालुका म्हणून कर्जत जामखेड या मतदारसंघाची ओळख होती.

मात्र २०१९ च्या निवडणुकीच्या आधी आमदार रोहित पवार यांनी गावोगावी पाण्याचे टँकर लावून उन्हाळ्यामध्ये मतदारसंघातील नागरिकांना पाण्याची कमी पडून दिली नव्हती त्यामुळे मतदारसंघाच्या बाहेरून आलेल्या नवख्या रोहित पवार यांना कर्जत जामखेडकरांनी स्वीकारून त्यांच्यावर विजयाचा गुलाल उधळला होता. मात्र या निवडणुकीत तत्कालीन मंत्री असतानाही आणि अनेक खात्यांचा कारभार असतानाही आमदार राम शिंदे यांचा पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळेच भाजपने पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न चांगलाच गाजला आहे. रोहित पवार यांनी मंजूर केलेली एमआयडीसी सरकारने रद्द करून दुसरीकडे जागा घेऊन तिथे एमआयडीसी मंजूर केली आहे.

आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे गेल्या ५ वर्षांपासून विकासाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. नुकत्याच झालेल्या कुसडगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावरूनही मतदारसंघात मोठा कलगीतुरा रंगला होता. कर्जत जामखेडच्या मधून जाणारा राज्य महामार्ग असलेल्या नगर सोलापूर या महामार्गावरून अनेक वेळा कामाचे श्रेय कोणी घ्यायचे यासाठी पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली होती.

भाजपचे सरकार आल्यापासून कर्जत-जामखेड तालुक्याला मोठा निधी मिळाला आहे आणि २०१९ आधी आमदार असताना आणि मंत्री असताना मोठ्या प्रमाणात कर्जत-जामखेड तालुक्यात निधी आल्यामुळेच कर्जत जामखेड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आता मतदारसंघातील लोक पाहू लागले आहेत आणि त्या निधीवरच मोठा विकास झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जनता मला निवडून देतील आणि परकीय अतिक्रमण आपल्याला चालणार नाही खऱ्या अर्थाने भूमिपुत्राची गरज आहे असे राम शिंदे म्हणतात.

दरम्यान, याच मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सध्यातरी त्यांच्या पक्षाकडून कोणी इच्छुक नसले तरी काँग्रेसची भूमिका काय राहणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. कारण या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने दावा केला होता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी ही केलेली आहे. मात्र काँग्रेस पक्षाकडून उमेदवार कोण राहील याबाबत अद्यापही कोणाचे नाव समोर आलेले नाही. मध्यंतरीच्या काळात आमदार रोहित पवार यांचे अनेक खंदे समर्थक नाराज होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कुठेतरी आमदार रोहित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामं केल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. अनेक योजना कर्जत जामखेड मतदार संघात आणल्या आहेत. रस्ते, पाणी प्रश्न आणि मुख्यता म्हणजे एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत ५ वर्षे पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला होता. मात्र सरकार आणि येथील स्थानिक नेत्यांनी मला श्रेय मिळू नये म्हणून खोटे आरोप करत एमआयडीसीचा प्रकल्प दुसरीकडे वळाला असला तरी कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांना सर्व गोष्ट माहित आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे यावर्षीची निवडणूक आपण लढून जिंकून येणार असल्याचा विश्वास आमदार रोहित पवार यांना आहे.

विद्यमान आमदार रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू असल्यामुळे या मतदारसंघावर शरद पवार लक्ष ठेवून असणार आहेत. मागील निवडणुकीतही शरद पवार यांनी कर्जत -जामखेडमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. त्यामुळे नवख्या असलेल्या रोहित पवार यांना विजय मिळवता आला असला तरी मात्र पाच वर्षात अनेक गणित बदलले आहेत आणि काही दिवसांपासून भाजपचे आमदार राम शिंदे हे सक्रिय झाल्यामुळे ही लढत मोठ्या चुरशीची होण्याची शक्यता आहे. सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात असताना राम शिंदे यांनीही मागे न राहता त्यांनीही विविध सांस्कृतिक आणि महिलांचे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीच्या प्रचारास जोरात सुरुवात केली आहे. दोन्ही उमेदवारांना एक जोखमीची बाजू म्हणजे विशेषता जामखेड तालुका हा बीड जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे या ठिकाणी जरांगे फॅक्टरचाही मोठा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे आमदार राम शिंदे यांच्यासमोर जरांगे फॅक्टरचे मोठे आव्हान असू शकते.

वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी मागील वर्षी उमेदवार दिला होता. मात्र वंचित बहुजन आघाडीची जादू चालली नसली तरी संभाजी राजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्या आघाडी कडून कोण उभे राहील याकडेही या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. कर्जत जामखेड मतदार संघातील रस्ते पूर्वीपेक्षाही चांगले झाले असून आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटत आला आहे त्यामुळे फक्त आता बेरोजगारी कमी करण्यासाठी एमआयडीसीचा प्रश्न जो सोडवेल त्या नेत्यामागे कर्जत जामखेड मधील मतदार राहू शकतो त्यामुळे आता या एमआयडीसीच्या मुद्द्यावर आणि आपला तो आपलाच या मुद्द्यावर ही निवडणूक मोठी गाजणार आहे त्यामुळे थंडीतही या मतदारसंघात वातावरण चांगलेच गरम होण्यास सुरुवात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्तार कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटात सामील होताच हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

Virat Kohli Record : रनमशीन कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड; थेट तेंडुलकर-गावसकर क्लबमध्ये एन्ट्री

India vs New Zealand : विराट कोहली आणि सरफराजने डाव सावरला; भारताचं जोरदार कमबॅक, न्यूझीलंडकडे १२५ धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT