‘ऑपरेशन टायगर’वर फडणवीसांचा ब्रेक
ठाकरेसेना आणि राष्ट्रवादीला दिलासा
खासदार फोडून संख्याबळ वाढवण्याचा शिंदेसेनेचा प्लॅन
आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता
कट्टर राजकीय विरोधक असलेल्या ठाकरेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीला मुख्यमंत्री फडणवीस धावून गेल्याची चर्चा रंगलीय. फडणवीसांनी पवार आणि ठाकरेसेनेला कशी मदत केलीय ? शिंदे सेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ला कसा ब्रेक लावलाय... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
राज्यात पुन्हा एकदा शिंदेसेनेकडून ठाकरेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना गळाला लावत ऑपरेशन टायगर राबवण्याच्या हालचालींची चर्चा रंगली होती.. मात्र ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असताना पवार आणि ठाकरेसेनेच्या मदतीला मुख्यमंत्री फडणवीस धावले आणि त्यांनी शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
खरंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. याच दौऱ्यात खासदारांची बैठक घेतली आणि राज्यात बातमी धडकली ती शिंदे ठाकरेसेनेचे 6 आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या 6 खासदारांना गळाला लावून ऑपरेशन टायगर राबवण्याची. याच बैठकीनंतर ठाकरेसेनाही अलर्ट झाली आणि उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. याच बैठकीत ठाकरेसेनेच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे आता ठाकरेसेना फुटण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच मुंबईत सुत्रं वेगाने फिरायला लागली.
याच दरम्यान आदित्य ठाकरे आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच शिंदेंनी फडणवीसांची भेट घेतली. आणि याच भेटीत फडणवीसांनी ठाकरेसेना आणि पवारांची राष्ट्रवादी फोडण्यास नकार देत ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र सत्तेत असलेले शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवण्याच्या हालचाली सुरू करण्यामागचं कारण होतं,बार्गेनिंग पॉवर वाढवणं.
सध्या शिंदेसेनेकडे 7 खासदार आहेत. आता ठाकरेसेनेचे 6 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 खासदार फोडल्यास शिंदेसेनेचं संख्याबळ 19 होण्याची शक्यता आहे. याच खासदारांच्या माध्यमातून मजबूत गट निर्माण करत केंद्रात बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची शिंदेसेनेची रणनीती आहे. एवढंच नाही तर 2029 च्या लोकसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठीही याचा फायदा व्हावा हा शिंदेसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
एका बाजूला शिंदेसेना ऑपरेशन टायगर राबवण्याच्या हालचाली करत असताना दुसरीकडे ठाकरेसेना, पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत वाढत चाललेल्या जवळीकीमुळेच फडणवीसांनी ऑपरेशन टायगरला ब्रेक लावलाय का? आणि आता शिंदे मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश मान्य करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.