विधान परिषदेच्या ५ जागांचा अंतिम निकाल जाहीर
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला ३ जागांवर यश
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला २ जागा मिळाल्या
विधानपरिषदेच्या ५ जागांचा निकाल अखेर लागला. ४५ तासांनंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले. पाच पैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. तर महायुतीला २ जागा मिळवण्यात यश आले. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले, पुण्याच्या पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख विजयी झाल्या. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले. तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतापसिंग पाटील यांनी बाजी मारली.
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा विजय झाला. भाजपचे उममेदवार कौस्तुभ गावडे विजयी झाले. ते ६००० मतांच्या फरकाने विजयी झाले. कौस्तुभ गावडे यांनी शिंदेसेनेचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला. तर विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचाही या निवडणुकीत भाजपने दारूण पराभव केला.
पुणे पदवीधर मतदारसंघ -
पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा पराभव केला. हर्षदा देशमुख यांना १ लाख १३ हजार ८४० मतं मिळाली. हर्षदा देशमुख यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला. शरद पवारांचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे विजयी झाले. ते १८ हजार १२४ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ८५ हजार ८७६ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते मिळाली. आज ४५ तासांनंतर म्हणजे पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी घोषित केले.
अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदेसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला. या निवडणुकीत त्यांनी काँगग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांचा पराभव केला. पसंती क्रमांक २ च्या मतमोजणीमध्ये किरण सरनाईक यांचा विजय झाला. महत्वाचे म्हणजे, २०२० च्या निवडणुकीत किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि त्यात ते विजयी देखील झाले होते.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारत भाजपचा पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा विजय झाला. अभिजीत वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. अभिजीत वंजारी यांना एकूण ६७ हजार २३१ मतं मिळाली. तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार २३१ मतं मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.