Maharashtra Government Renames Sawantwadi Railway Station : राज्य सरकारने कोकणवासीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासीयांची महत्त्वाची मागणी अखेर मार्गी लागली आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून आता ते ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या कोकण रेल्वे उभारणीतील अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर आता या नामकरणाचा अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचाही समावेश आहे.
प्रा. मधू दंडवते ९० च्या दशकात कोकणातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी भारताचे रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिलेय. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांसाठी त्यांना ओळखले जायचे. दंडवते हे ‘कोकण रेल्वेचे शिल्पकार’ म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला द्यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होती. अखेर ती मागणी आता पूर्ण झाली आहे.
मधू दंडवते हे सलग ६ वेळा राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. १९७१ मध्ये बॅ. नाथ पै यांच्या निधनानंतर त्यांनी ही जागा लढवली आणि जिंकली. दंडवते यांनी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री (१९७७) आणि व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री (१९८९) म्हणून यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या. रेल्वेमंत्री असताना मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.