अक्षय गवळी, साम टीव्ही
दुष्काळ जाहीर झाला. पण मदतीची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. शेतात पिकलेच नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि समोर सणासुदीचे दिवस. या विवंचनेतून तेल्हारा तालुक्यातील 65 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आलीये. गाडेगाव येथील सुखदेव जयराम नळकांडे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सततची नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे ते त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्याची पाचवी आत्महत्या आहे.
ज्या शेतात आयुष्यभर कष्ट केले. त्याच शेतात सुखदेव नळकांडे यांची जीवनयात्रा संपली. वयाची 65 वर्षे उलटली, मात्र संकटांनी त्यांची पाठ सोडली नाही. सततची नापिकी, बँकेचं कर्ज आणि आर्थिक विवंचना यामुळे ते अडचणीत सापडले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही मदत मिळाली नसल्याची खंत आणि आगामी नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर वाढलेली चिंता, अशा परिस्थितीत त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमकी कारणं तपासानंतरच स्पष्ट होतील. सुखदेव नळकांडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी आणि नातवंडं असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरपलाय.
यंदा पीक पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेला घास हा एल निनोने हिसकावून घेतला. नेत्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली, दुष्काळ जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात एक रुपयाची देखील मदत न झाल्याने शेतकरी हा टोकाचे पाऊल उचलत आहे. आर्थिक मदत देण्यासाठी सरकार अजून किती दिवस लावणार आणि आणखी अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.