जळगाव तालुक्यातील भोकर येथील SBI बँकेत शनिवारी दुपारी सशस्त्र दरोडा
दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली
या दरोड्यामागे बडतर्फ PSI चा हात असल्याची माहिती
जळगाव तालुक्यातील भोकरमध्ये SBI बँकेत शनिवारी भरदुपारी सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली. हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या चार चोरट्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावत तब्बल १५ लाख रुपये रोख आणि सुमारे २७ किलो सोने लुटले. मात्र, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने वेगाने कारवाई करत अवघ्या दोन तासांत चारही आरोपींना मुद्देमालासह पकडले. धक्कादायक म्हणजे या दरोड्याचा म्होरक्या बडतर्फ पीएसआय असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोन स्पोर्ट्स बाईकवरून चार तरुण भोकर येथील SBI बँकेत आले. चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटणे कठीण होते. बँकेत शिरताच त्यांनी जयेश राणे यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांना लॉकर रूममध्ये नेण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी विरोध केल्याने दरोडेखोरांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या. यामुळे बँकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर चोरट्यांनी बँकेतील १६ लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि १५ लाख रुपयांची रोकड सहा बॅगांमध्ये भरली. मुद्देमाल घेऊन ते दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानिक नागरिक आणि पोलिस पाटलांच्या मदतीने करंज, आमोदा-जळगाव, आमोदा-विदगाव आणि भोकर-डिकसाई या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली.
ग्रामस्थांनीही संशयित दुचाकींचा पाठलाग केला. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. पळून जाताना दरोडेखोरांनी धरणगावच्या दिशेने जात चावलखेडा येथील रेल्वे पुलाजवळ चार बॅगा फेकून दिल्या. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. अखेर पोलिसांनी चारही आरोपींना पकडून लुटलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. या दरोड्याचा कट कारागृहात असतानाच एका बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने रचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता अधिक महत्त्वाचा ठरला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.