जळगाव : सध्या होत असलेल्या भारनियमनातून सर्वच त्रस्त झाले आहेत. परंतु, हे भारनियमन व्हायला वीज गळती कारणीभूत असते. मुळात वीज गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी बिल वसुली व वीज चोरी रोखणे आवश्यक आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात याच कारणाने भारनियमन होत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या वीज चोरीतून २४.६५ टक्के वीज गळती होत आहे. (jalgaon news Power theft case of Rs 11.5 crore)
जळगाव जिल्ह्यात वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणतर्फे (MSEDCL) सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. तरीदेखील वीज चोरी पूर्णपणे रोखणे शक्य झालेले नाही. यामुळे बिल भरत असलेल्या वीज ग्राहकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने वीज चोरीचे असे स्पॉट निवडून तेथील आकडे काढण्याची मोहीम स्वतंत्रपणे राबवून आकडेमुक्त परिसर करणे हाच वीज गळती रोखण्यासाठी कामी येवू शकतो.
वर्षभरात साडेअकरा कोटींची वीजचोरी
जळगाव जिल्ह्यात एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षात ६ हजार ४० वीजचोरांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात विजेच्या अनधिकृत वापराची (शेजारून वीज घेणे, एका प्रयोजनासाठी वीज जोडणी घेऊन दुसऱ्याच प्रयोजनासाठी वापरणे आदी २३० प्रकरणे उघडकीस आली. तर आकडा टाकून थेट वीज चोरल्याची २ हजार ३११ प्रकरणे, तर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याची ३ हजार ४९९ प्रकरणे आहेत. यांच्याकडून ७८ लाख ४५ हजार १२८ युनिटची ११ कोटी ५९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे.
गुन्हेही केले दाखल
मागील वर्षात अर्थात २०२१-२२ या वर्षभरात वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ४८ ग्राहकांवर महावितरणतर्फे पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, ६०४० प्रकरणांपैकी केवळ २१४७ प्रकरणांमध्ये ग्राहकांनी वीजचोरीची बिले व तडजोड शुल्क भरले आहे. वीजचोरी विरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊन विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वीज गळती रोखण्याचे आव्हान
आकडे, मीटरमधील फेरफार अशा वीजचोरीच्या प्रकारातून होत असलेली वीज गळती रोखणे हे महावितरण समोर आव्हानच आहे. गतवर्षभराची स्थिती पाहता जळगाव जिल्ह्याची वीज वितरण हानी २४.६५ टक्के आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.