चाळीसगाव (जळगाव) : बसमध्ये प्रवास करताना प्रवासी महिलेची लागलेली डुलकी त्यांना महागात पडली. या महिलेच्या सीटवर बसलेल्या अनोळखी महिलेने ही संधी साधत बॅगेतील सोन्याचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने असलेला डबा हातचलाखीने लंपास केला. चोरीचा हा प्रकार भडगाव ते चाळीसगाव (Chalisgaon) दरम्यान घडला असून, या प्रकरणी शहर पोलिस (Police) ठाण्यात अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon crime news Two lakh jewelery theft in the running bus)
औरंगाबाद येथील सिडको परिसरातील रायगडनगरातील शोभा शिवाजी पाटील (वय ५३) या तळई (ता. एरंडोल) येथे भाच्याच्या लग्नाला आलेल्या होत्या. लग्न आटोपून शनिवारी (ता.१६) त्या औरंगाबादला घरी निघाल्या. सकाळी पावणेअकराच्या सुमारास भडगाव स्थानकावरून त्यांनी चाळीसगावकडे जाणारी बस पकडली. त्यांच्याजवळच्या बॅगेत सुमारे दोन लाखांचे सोन्याचे वेगवेगळे दागिने होते. जे त्यांनी बॅगेतील एका प्लास्टिकच्या छोट्या डब्यात ठेवलेले होते. शोभा पाटील ज्या सीटवर बसलेल्या होत्या, त्यांच्या शेजारी साधारणत: ३० ते ३५ वयाची अनोळखी महिला येऊन बसली. तिने तिच्याजवळील बॅग शोभा पाटील यांच्या बॅगेवर ठेवली.
डुलकी लागताच डाव साधला
बस भडगावहून चाळीसगावकडे येत असताना प्रवासादरम्यान शोभा पाटील यांना डुलकी लागली. काही वेळाने मुलीचा फोन आल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी बस नगरदेवळा बसस्थानकावर आलेली होती. शोभा पाटील यांच्याशेजारी बसलेली अनोळखी महिला नगरदेवळा स्थानकावर घाईघाईने बसमधून उतरून निघून गेली. चाळीसगावला दुपारी पावणेबाराच्या सुमारास आली असता शोभा पाटील यांना त्यांच्या बॅगची चेन उघडी दिसली. त्यांनी बसमधून खाली उतरून बॅगेची पाहणी केली असता, त्यातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. घडलेल्या प्रकाराने शोभा पाटील यांना धक्का बसला. त्या एकट्या असल्याने त्यांनी दुसऱ्या बसने औरंगाबाद गाठले व घरच्यांना चोरीची माहिती दिल्यानंतर त्यांनी चाळीसगाव गाठून पोलिसांना आपबिती कथन केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन आव्हाड तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.