जलयुक्त शिवार योजनेच्या चुकीच्या कामांमुळेच मराठवाडा पाण्यात - तज्ज्ञांचा दावा Saam Tv News
महाराष्ट्र

जलयुक्त शिवार योजनेच्या चुकीच्या कामांमुळेच मराठवाडा पाण्यात - तज्ज्ञांचा दावा

जलयुक्त शिवार योजनेच्या चुकीच्या कामांमुळे नदीपात्र बदलल्यानं मराठवाड्याला पुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे.

डॉ. माधव सावरगावे

जलयुक्त शिवार योजनेच्या चुकीच्या कामांमुळे नदीपात्र बदलल्यानं मराठवाड्याला पुराचा धोका निर्माण झाल्याचा दावा पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. शिवाय जलयुक्त शिवारातील चुकीच्या कामांमुळे मराठवाडा पाण्यात गेल्यानं त्याची सखोल चौकशी करून पुढचा धोका टाळण्याचीही मागणी करण्यात आली आहे. (In Marathwada flood due to wrong works of Jalayukta Shivar Yojana - experts claim)

हे देखील पहा -

केवळ २४ तासांत अतिवृष्टीमुळे सगळ्या मराठवाड्यात पाणीच-पाणी झाले. शेती पाण्याखाली गेली. लाखो कुटुंबांचे संसार आज पाण्यात आहेत आणि त्यामुळेच ही परिस्थिती का ओढवली यावर विचार सुरु असताना पर्यावरण तज्ज्ञ आणि जल-भूमी अभ्यासकांनी जलयुक्तच्या कामाला दोषी ठरवलंय. मराठवाड्यातील बहुतांश नद्यांचे पात्र बदलल्यामुळे महापुराने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. पावसाचे पाणी गावांत शिरले. अतिक्रमणे, भराव, जलयुक्त शिवार योजनेत खोलीकरणातून उपसलेला गाळ पुन्हा नदीतच गेल्यामुळे मराठवाड्यात महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी सांगितलंय. शिवाय त्यांनी याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

मराठवाड्यातील नदीपात्रांच्या खोलीकरणाचे काम जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आले. हे काम करीत असताना पात्रातील गाळ नदीच्या काठावर तसाच पडून राहिला. परिणामी पावसाळ्यात तोच गाळ पुन्हा नदीच्या पात्रात आल्यामुळे पात्रे उथळ होत गेले. नद्यांचा प्रवाह बदलून गावांमध्ये रस्त्यांवर पूर आला. अनेक गावं पाण्यात गेली, शेती पिकं भुईसपाट झाली. या जलयुक्त शिवाराच्या कामाबाबत यापूर्वीच शंका उपस्थित केली होती. त्यासोबत न्यायालयातही हे प्रकरण गेले. महाविकास आघाडीने याची खुली चौकशी करण्याचीही घोषणा केली. पण पैसे पाण्यात गेले, लोक पाण्यात गेले, अनेकांचे जीव गेले, त्यामुळे याचे तांत्रिक आणि आर्थिक या दोन्ही बाजूने ऑडिट केले पाहिजे, अशी मागणी पर्यावरण आणि कृषी अर्थतज्ज्ञ एच.एम. देसरडा यांनी केली आहे.

विशेष म्हणजे या कामाबाबत यापूर्वी तक्रार करण्यात आली होती. एच. एम. देसरडा यांनी तत्कलीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या कामाच्या अनियमितता आणि चुकीच्या कामाची माहिती दिली होती, त्यावेळी जर हे लक्षात घेतले असते तर आज ही परिस्थिती उदभवली नसती, असा त्यांचा दावा आहे. मात्र, तत्कालीन विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हे फेटाळले आहे.

मराठवाड्यातील सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी २०१४-१५ या वर्षांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जलयुक्त शिवार योजना आणली. त्यासाठी मराठवाड्यात अंदाजित २४१७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यातून एक लाख ७४ हजार कामे झाल्याची आकडेवारी समोर आली. आता इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कामावर जलतज्ज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांनी बोट ठेवल्याने महाविकास आघाडीला आता आयतंच कोलीत मिळालंय. त्यातून आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. मात्र, जलयुक्तच्या कामामुळेच ही परिस्थिती निर्माण झालीय का? यातील सत्य मात्र मराठवाड्यातील जनतेसमोर आले पाहिजे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :परळीत धनंजय मुंडे आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT