रश्मी पुराणिक, मुंबई
मुंबई: मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांबाबतीत घेतलेली बैठक म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे, तर मुंबईच्या महपौर आता धावाधाव करीत आहेत, कारण त्यांना पळता भुई थोडी झालेली आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या विषयावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली. तर मा. खा.सुप्रिया सुळे यांचा "सेल्फी विथ् खड्डे"कार्यक्रम आता कुठे गेला? असा खोचक सवालही त्यांनी केला. (BJP MLA Ashish Shelar slams to mumbai's mayor for pits on road)
हे देखील पहा -
खड्डे या विषयावर पत्रकारांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मा. मुख्यमंत्र्यांनी काल केलेले विधान हे भाषणातील वाक्याप्रमाणे आहे. जर मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभरातले रस्ते ज्या विविध एजन्सीच्या अंतर्गत येतात त्या सगळ्या एजन्सीची बैठक घेतली असती तर आम्हाला पटलं असतं. त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या तरी कंत्राटदारावर कारवाई केली असती तर आमचा विश्वास बसला असता. खड्डे बुजवण्यासाठी वापरात येणाऱ्या मालाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली असतील तर खरे वाटले असते. त्यामुळे खड्ड्यांबाबत जी बैठक झाली तो सेल्फी विथ् खड्डेसारखा दिखाऊपणा होता. केवळ दिखाऊपणा केल्याने जनतेचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत. आता माननीय खा. सुप्रियाताई सुळे कुठे गेल्या? सेल्फी विथ् खड्डे हा त्यांचा कार्यक्रम कुठे गेला? त्यांनीही भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती करतो असेही ते म्हणाले.
"खड्यांमुळे महापौरांना पळता भुई थोडी झालेय!"
मुंबईतील खड्ड्याबाबत ते म्हणाले की, आता महापौरांचा प्रवास म्हणजे त्यांना पळताभुई थोडी झाली आहे. गणपतीपूर्वी पावसाळ्याच्या काळात महापौर महोदयांनी ही पाहणी केली असती तर जनतेला खरे वाटले असते. आता त्यांचा प्रवास आणि धावपळ ही पळताभुई थोडी आहे. आता मुंबईकर नागरिकांची त्रस्त भावना दिसते आहे. निवडणुका समोर आहेत, म्हणून धावाधाव सुरू आहे. कंत्राटदारांची बिलं काढण्यासाठी, एवढे खड्डे बुजवले, खड्ड्यांचे खोडे आकडे दाखवण्यासाठी, आकडे मोठे दाखवून कंत्राटदाराला मदत करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे.
25 वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च
मुंबईत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च झाले. कंत्राटदाराला महामार्ग मिळाला मुंबईकरांच्या रस्त्यांचे "रस्ते" लागले. केवळ यावर्षी प्रत्येक वॉर्डात दोन कोटी असे 48 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी खर्च होणार आहेत. महापालिकेचे पोर्टल सांगते 927 खड्डे, महापौर म्हणतात आम्ही 42000 खड्डे बुजवले, कंत्राटदाराला जास्त पैसे मिळाले पाहिजेत, म्हणून बनवाबनवी सुरु आहे. कंत्राटदाराच्या समर्थनाचे आकडे किंवा त्याच्या समर्थनाच्या भूमिका शिवसेना का घेते आहे? माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात कंत्राटदारांवर कारवाई करा, गेल्या वर्ष भरात महापालिकेने अशी एकदा तरी कारवाई केली का?
काल एका तरुणाने खड्ड्यात रांगोळी काढली, त्याच्यावर शिवसेनेकडून हल्ला तर होणार नाही ना? अशी भिती आहे, कारण मागे एका रेडिओ जॉकी ने एक गाणे तयार केले तेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले होते, जर असे पुन्हा या रांगोळी काढणाऱ्या तरुणाच्या बाबतीत कराल तर खबरदार, असा इशारा ही आमदार अँड आशिष शेलार यांनी दिला.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.