महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई.
जप्त तुपाची किंमत २० लाख २० हजार १९० रुपये.
भेसळ किंवा चुकीचे लेबलिंग असल्याच्या संशयावरून कारवाई.
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केलीय. छत्रपती संभाजीनगर शहरातील सुंदरवाडी परिसरात पतंजली कंपनीचे तब्बल २२८० लिटर गायीचे तूप जप्त करण्यात आले आहे. या तुपाची किंमत २० लाख २० हजार १९० रुपये इतकी आहे. भेसळयुक्त किंवा चुकीचे लेबल असलेले उत्पादन असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सणासुदीच्या काळात एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत १९ खाद्यपदार्थ व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आलेत. बाबा रामदेव यांच्या 'पतंजली आयुर्वेद'च्या एका वितरकाचाही समावेश आहे. या कारवाईदरम्यान ९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ३.५३ लाख किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. यात २०.२० लाख रुपये किमतीच्या २,२७९.७ लिटर 'पतंजली' गाईच्या तुपाचाही समावेश आहे.
सुंदरवाडी येथील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या मेसर्स दिव्य डिस्ट्रीब्यूटर या पतंजली आयुर्वेदच्या सुपर डिस्ट्रीब्युटरच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. यावेळी विक्रीसाठी ठेवलेला पतंजली गायीच्या तुपाचा मोठा साठा संशयास्पद आढळून आला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या बॅचमधील एकूण ४ हजार ३२ युनिट्स जप्त केले आहेत. यामध्ये १३४९.१ लिटर आणि ९३०.६ लिटर अशा दोन बॅचमधील तुपाचा समावेश आहे.
या दोन्ही साठ्याची एकत्रित किंमत २० लाख २० हजार १९० रुपये आहे. अन्न सुरक्षितता आणि मानके कायदा २००६ च्या तरतुदींनुसार हा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या तुपाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिलाय. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४,०३२ युनिट तूप जप्त करण्यात आलंय. यामध्ये २,९९८ युनिट (१,३४९.१ लिटर, मूल्य १२.२९ लाख रुपये) आणि १,०३४ युनिट (९३०.६ लिटर, मूल्य ७.९१ लाख रुपये) तुपाचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात असे दिसून आले की, हा साठा 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६' (Food Safety and Standards Act, 2006) च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा होता. यासह मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागांतील १९ आस्थापनांचा समावेश आहे. यात नमकीन, मिठाई आणि मसाले तयार करणाऱ्या युनिट्सचा समावेश आहे—परवाने आणि नोंदणी एफडीएने निलंबित केली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.