भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधान भवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतीनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
लडाखमध्ये ITBP जवानांनी स्वातंत्र्य दिन साजरा केलाय. लेह लडाखमध्ये तब्बल 14 हजार फुटांवर स्वातंत्र्य दिन साजरा केलाय. ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे, त्या ठिकाणी हातात तिरंगा घेऊन घोषणा देत ITBP जवानांनी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केलाय.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतीकारकाच्या क्रांतीच्या आठवणी जपल्या जाव्यात यासाठी राजगुरुनगर येथील जन्मवाड्यावर मोठ्या संख्येने राजगुरू प्रेमीसह विद्यार्थी महिलांची लक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली. सकाळी १० :१० मिनिटांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी क्रांतीकारकांच्या देशभक्तीची प्रेरणा घेत घोषणाबाजी करण्यात आली.
जालना येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहणाचा हा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमाला माजी मंत्री अर्जुन खोतकर ,आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची उपस्थिती होती,यावेळी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा, सत्कार करण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे सह मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
वर्ध्यात स्वातंत्रदिनाचे औचित्य साधतं जलजन्य कीटकजन्य आजाराच्या जनजागृतीसाठी ग्रामीण आरोग्य संदेश यात्रा काढण्यात आलीय. ही यात्रा वैद्यकीय जनजागृती मंच व डॉक्टर सचिन पावडे मित्र परिवाराच्या वतीने काढण्यात आलीय. वर्धा शहरासह ग्रामीण भागात तब्ब्ल शंभर किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार आहे. या बाईक रॅलीच्या माध्यमातून कीटकजन्य जलजन्य आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलंय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सकाळी ठीक १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. झेंडावंदन झाल्यानंतर पदाधिकारी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करणार आहेत.
किल्ले रायगडावर स्वातंत्र दिना निमित्ताने आज ध्वजारोहण संपन्न झाले. महाडचे नायब तहसिलदार B.S. भाबड यांच्या हस्ते हे ध्वजारोहन करण्यात आहे. पोलीस दल, पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि शिवप्रेमींनी ध्वजाला सलामी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन संबोधित करताना बांगलादेशातील हिंसाचाराचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, बांगलादेशमध्ये जे काही घडले त्याबद्दल एक शेजारी देश म्हणून काळजी करणे स्वाभाविक आहे. मला आशा आहे की तिथली परिस्थिती लवकरच सामान्य होईल. तेथील अल्पसंख्याक हिंदू समाजाची सुरक्षा महत्वाची आहे. तेथील हिंदूची सुरक्षा सुनिश्चित व्हावी, अशी देशवासीयांची इच्छा आहे. शेजारच्या देशांनी सुख आणि शांतीचा मार्ग अवलंबावा अशी भारताची नेहमीच इच्छा असते. शांततेसाठी आपली बांधिलकी आहे. येणाऱ्या काळात बांगलादेशचा विकास प्रवास केवळ आपल्या शुभेच्छांवरच चालणार आहे, कारण आपण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारे लोक आहोत, असे मोदी म्हणाले.
भ्रष्टाचारामुळे भारतातील नागरिक हैराण आहेत. प्रत्येक स्तरावरील भ्रष्टाचाराने जनतेच्या विश्वासाला तडा गेला आहे. आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्याची किंमत मला माहिती आहे. माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे, पण माझी प्रतिष्ठा राष्ट्रापेक्षा मोठी नाही. माझे स्वप्न देशाच्या स्वप्नांपेक्षा मोठे असू शकत नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराविरुद्धचा माझा लढा सुरूच राहणार आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरू होईल. मला भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध भीतीचे वातावरण निर्माण करायचे आहे.
आपल्या देशात काही लोक भ्रष्टाचाराचा गौरव करत आहेत, उघडपणे त्याचा जयजयकार करत आहेत. हे समाजासाठी आव्हान बनले आहे, असे मोदी म्हणाले.
परिवारवाद आणि जातीवादामुळे लोकशाहीचे मोठं नुकसान होत आहे, यापासून देशाला मुक्ती द्यावी लागेल. ज्यांच्या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा एक लाख लोकांना पुढे आणणे हे आमचे एक ध्येय आहे. यातूनच देशाला वंशवाद आणि जातीयवादापासून मुक्ती मिळेल. यातून नवीन कल्पना समोर येतील, असे मोदी म्हणाले.
नागपुरातील भाजप कार्यालयात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी टिळक पुतळा चौकात भाजपचे शहरातील सगळे आमदार आणि पदाधिकारी उपस्थितीत होते. ध्वजारोहण नंतर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
नांदेड जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्वच विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
आज प्रत्येक कामाला निवडणुकीचा रंग दिला जातो. सर्वच राजकीय पक्षांनी आपली मते मांडली आहेत. एक समिती आपला अहवाल तयार करत आहे. वन नेशन, वन इलेक्शनसाठी देशाला पुढे यावे लागेल. भारताच्या प्रगतीसाठी एक राष्ट्र, एक निवडणूक हे स्वप्न साकार करण्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी पुढे यावे, असे आवाहन करतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे. देशप्रेमाची ज्योत कायम पेटत राहिली पाहिजे. देशातील प्रत्येक घटकाचा विकास आपली जबाबदारी आहे. सर्व समाजाचा विकास म्हणजे स्वातंत्र, असं शिंदे म्हणाले आहेत.
आपण नव्या संकल्पासह पुढे जात आहे. पण काही लोकांना भारताची प्रगती दिसत नाही. ते भारताच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत, कारण जोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही तोपर्यंत ते कोणाच्याही भल्याचा विचार करणार नाहीत. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना टाळावे लागेल. ते निराशेच्या गर्तेत बुडलेले लोक आहेत. अशा लोकांपासून देशाला सावध राहावे लागेल.
जसजशी आपली ताकद वाढेल, तसतशी आपल्या पुढील आव्हाने वाढणार आहेच. बाह्य आव्हानेही वाढणार आहेत. पण भारताचा विकास कोणावरही संकट आणत नाही. आम्ही जगाला कधीही युद्धात नेले नाही. आपण बुद्धांच्या देशात आहोत, युद्धाच्या नाही. भारताच्या प्रगतीची चिंता करू त्यांनी नये. कितीही आव्हाने असली तरी. आव्हान पेलणे भारताच्या स्वभावात आहे, असे मोदी म्हणाले.
नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली. सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देत आहे. येणाऱ्या दिवसात भारताच्या खेळाडूंचे आणखी एक पथक पॅरिसमध्ये होत असलेल्या पॅराऑलिम्पिकसाठी जात आहे, त्या सर्वांना मी शुभेच्छा देत आहे.
भारताने जी२० चे यशस्वी आयोजन केले. अनेक शहरात २०० पेक्षा जास्त इव्हेंट आयोजित करण्यात आले. भारत देश मोठे इव्हेंट यशस्वी आयोजित करु शकतो, हे दाखवून दिले. त्यामुळे २०३६ मध्ये होत असलेले ऑलिम्पिकचे यजमानपद आपल्याला मिळावे, हे माझं स्वप्न आहे.
नागपूर विभागीय कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय ध्वजारोहण केलंय.
उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते. खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, अजय चौधरी आणि शिवसेना नेते दिवाकर रावते उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा समारंभ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण होत आहे.
पीएम मोदी म्हणाले की, आधी आपण बाहेरुन शस्त्रे खरेदी करत होतो, त्यासाठी डिफेन्स बजेट वेगळं ठेवण्यात यायचं. आज आपण संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होत आहोत. संरक्षण उपकरणे निर्मितीमध्ये आज आपली वेगळी ओळख आहे. भारत संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने उपस्थित होते.
देशात काही चिंतेच्या बाबी आहेत. मला इथून माझी वेदना मांडायची आहे. आपल्या माता, बहिणी, मुलींवर होत असलेल्या अत्याचारांचा समाज म्हणून आपण विचार करायलाच हवा. देशात होत असलेल्या अत्याराच्या घटनांमुळे लोकांच्या मनात राग आहे. राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. महिलांवरील गुन्ह्यांचा लवकरात लवकर तपास व्हावा. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. कारण, समाजात विश्वास संपादन करण्यासाठी हे आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्यांची चर्चा होते. पण हे करणाऱ्या राक्षसी माणसाला शिक्षा झाली की, या बातम्या दिसत नाहीत, कुठेतरी कोपऱ्यात दिसते. त्यावर चर्चा होत नाही. आता असे पाप करणाऱ्या गुन्हेगारांबद्दल व्यापक चर्चा व्हायला हवी, जेणेकरून असे पाप करणाऱ्यांनाही फासावर लटकावे लागेल अशी भीती वाटावी, काळाची गरज आहे. राक्षसीवृत्ती असणाऱ्या लोकांमध्ये ही भीती निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, आम्ही या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांचे स्मरण करतो. विकसित भारत 2047 च्या ध्येयासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे, असं आवाहन करतो..
प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली ताकद दाखवून दिली. महिला आधारित विकासाच्या मॉडेलवर काम केलेय. इनोव्हेशन आणि उद्योजकतेसह प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिला फक्त सहभाग घेत नाहीत, तर नेतृत्व करत आहेत. आपल्या लष्कर, नौदल, हवाई दल आणि अंतराळ क्षेत्रात महिलांची ताकद दिसून येत आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आपल्याला भर देण्याची गरज आहे. चंद्रयान मिशनच्या यशानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाप्रति विद्यार्थ्यांची रुची वाढली. यालाच योग्य दिशेला आणि पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. सरकारकडून रिसर्चसाठी करण्यात येणारी मदत वाढवण्यात आली. नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची व्यवस्था केली. अर्थसंकल्पात संशोधन आणि इनोव्हेशनवर १ लाख कोटी रुपये खर्च करण्याचे वचन घेत आहे, असे मोदी म्हणाले.
भारतामधील प्रत्येक क्षेत्रांमध्ये 5G पोहचले आहे. आम्ही 5G वरच थांबणार नाही. सध्या 6G मिशन मोडवर काम सुरु केले आहे. लवकरच देशभरात 6G लाँच होईल.
मेडिकलच्या शिक्षणासाठी विद्यार्थी बाहेर जात आहेत. त्यामुळे दहा वर्षांमध्ये आपण मेडिकल जागांची संख्या वाढवली. आता ही संख्या एक लाख झाली आहे. पुढील पाच वर्षांत मेडिकल कॉलजमधील ७५ हजार नव्या जागा वाढवण्यात येणार आहेत. मुलांना पोषण मिळावे यासाठी आम्ही राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केले आहे, असे मोदी म्हणाले.
देशात नवीन शैक्षणिक धोरण आणलेय. या माध्यमातून आता तरुणांना शिक्षणासाठी परदेशात जायची गरज भासणार नाही, तर परदेशातूनही लोक आपल्याकडे शिकायला येणार आहेत. बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ सुरू झाले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर विशेष भर देण्यात आला आहे. भाषेमुळे आपल्या देशाच्या प्रतिभेला आडकाठी येऊ नये. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शिक्षण नितीमुळे मातृभाषेला बळ मिळाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पुण्यात राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणाला पुण्याचे विभागीय आयुक्त चद्रकांत पुलकुंडवार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची देखील उपस्थित होते.
आपला देश आकांक्षांनी भरलेला आहे. प्रत्येक क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यावर आमचा फोकस आहे. त्यासाठी लागणाऱ्या बदलासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर काम करूया. नागरिकांच्या मूलभूत सुविधा बळकट केल्या पाहिजेत, त्यामुळेच समाज आकांक्षांनी भरलेला आहे. देशातील लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला आहे.
कोरोना महामारीमध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढवली. जात-पात-मत-पंथ याच्यावर जाऊन प्रत्येक घरी तिरंगा फडकवला जातो. त्यावेळी आपल्या देशाची दिशा व्यवस्थित असल्याचे वाटते. आज सगळा देश तिरंगा आहे, हर घर तिरंगा आहे. कोणतीही जात-पात नाही किंवा कुणी लहान मोठा नाही.. सर्व भारतीय आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाला सलग ११ व्यांदा संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ६० वर्षांनंतर लागोपाठ तिसऱ्यांदा देशाची सेवा कऱण्याची संधी दिली. लोकांचे आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत. प्रत्येकाची सेवा, प्रत्येक कुटुंबाची सेवा, प्रत्येक क्षेत्राची सेवा करत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहचवण्याचा संदेश मिळाला आहे. या लाल किल्ल्यावरून मी देशवासियांना नमन करतो, असे मोदी म्हणाले.
विकसित भारत 2047 साठी आम्ही देशवासीयांकडून सूचना मागवल्या होत्या. आम्हाला मिळालेल्या अनेक सूचना या नागरिकांची स्वप्ने आणि आकांक्षा दर्शवतात. काही लोकांनी भारताला कौशल्याचे भांडवल बनवण्याचा सल्ला दिला तर काहींनी भारताला उत्पादन केंद्र बनवायला हवे आणि देश आत्मनिर्भर झाला पाहिजे असे सांगितले.
शासन आणि न्याय व्यवस्थेतील सुधारणा, ग्रीनफिल्ड शहरांचे बांधकाम, क्षमता वाढवणे, भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक, या नागरिकांच्या आकांक्षा आहेत. जेव्हा देशातील लोकांची अशी मोठी स्वप्ने असतात, तेव्हा ते आपला आत्मविश्वास नव्या उंचीवर घेऊन जातात आणि आपण अधिक दृढनिश्चयी बनतो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
देशवासीयांच्या हितासाठी 1500 हून अधिक कायदे रद्द करण्यात आले. छोट्या छोट्या चुकांसाठी तुरुंगात टाकणारे कायदेही आम्ही रद्द केले. फौजदारी कायदा बदलला आहे. मी प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना आमच्या इज ऑफ लिव्हिंग मिशनच्या दिशेने पावले उचलण्यास मदत करण्यासाठी आवाहन करतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
बँकिंग क्षेत्रात ज्या सुधारणा झाल्या. त्याआधी बँकिंग क्षेत्राची काय स्थिती होती, याची कल्पना करा. आम्ही बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. आज आपल्या बँकांनी जगातील सर्वात मजबूत बँकांमध्ये आपले स्थान निश्चित केलं असल्याचं मोदी म्हणाले आहेत.
देशाचा ७८ वा स्वातंत्रदिन भारत-पाकिस्तान सीमेवरील सज्ज असणारे जवान मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. गुजारातमधील कच्छ येथील भारत-पाकिस्तान सीमेवरील BSF चे जवान त्यांच्या सीमेवरील मुख्यालयात स्वातंत्रदिन साजरा करत आहेत. यावेळी BSF चे DIG अनंत सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. सेक्टर हेडक्वाटर भूजचे जवान यावेळी ध्वाजारोहणाला सलामी देणार आहेत.
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आता सध्या ते उपस्थितांना संबोधित करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ११ व्यांदा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. ते म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वीचे ते दिवस आठवूया. शेकडो वर्षांची गुलामगिरी. प्रत्येक काळ हा संघर्षाचा आहे. महिला असो, तरुण असो, आदिवासी असो, ते सर्व गुलामगिरीविरुद्ध लढत राहिले. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यापूर्वीही आपल्याकडे अनेक आदिवासी भाग होते, जिथे स्वातंत्र्याची लढाई झाली.
स्वातंत्र्याची लढाई खूप काळ चालली. त्यात यातना झाल्या, जुलमी राजवटीने सर्वसामान्यांचा विश्वास तोडण्याचे डावपेच, तरीही त्या वेळी ४० कोटी जनतेने गुलामीचे पाश तोडले आणि भारताची ताकद दाखवून दिली. एख संकल्प, एक स्वप्न घेऊन ते पुढे चालत राहिले, लढले. त्यांचं एकच स्वप्न होतं, मेरा भारत देश महान राहिलाय पाहिजे. वंदे मातरम, हेच स्वातंत्र्याचं स्वप्न होतं.
एक काळ असा होता, जेव्हा लोक देशासाठी मरायला कटिबद्ध होते. आज देशासाठी जगण्याची कटिबद्धता करण्याची वेळ आली आहे.. देशासाठी मरण्याची बांधिलकी जर स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर देशासाठी जगण्याची बांधिलकी भारतालाही समृद्ध करू शकते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले आहेत.
यावर्षी आणि याआधीही मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक लोकांनी आपल्या कुटुंबाला गमावले आहे. संपत्ती गमावली. राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान झाले. आज मी त्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि या संकटाच्या काळात देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही देतो. देश पीडितांसोबत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाषणात म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात म्हणाले की, "या वर्षी आणि गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेकांनी आपले कुटुंब आणि मालमत्ता गमावली आहे. मी आज त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हणाले की, आजचा हा शुभ मुहूर्त आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरण पावलेल्या आणि आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सण आहे. हा देश, आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झालंय. त्यानंतर आता मोदी जनतेला संबोधित करत आहे.
78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावलाय. आता ते जनतेला संबोधित करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सिंहगड रोड उड्डाणपूल उद्घाटन ही पुणेकरांना आगळी वेगळी भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय.
राजघाटावर महात्मा गांधी अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर रवाना झालेत. भव्य तयारी लाल किल्ल्यावर करण्यात आलीय. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी ध्वजारोहन करतील.
जपानमधील भारतीय दूतावासात ध्वजारोहण समारंभ संपन्न झालाय. 78 वा स्वातंत्र्य दिन राजदूत साजरा करण्यासाठी पोहोचले होते.
राष्ट्रीय सेवा दलातर्फे मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदना करण्यात आली आहे, धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी धुळे शहरातील माजी सैनिक पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले, यावेळी परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित बघावयास मिळाली आहे,
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आज देशभर साजरा केला जात असतानाच, आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही तितक्याच देश भक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा ,पांढरा आणि केशरी या तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली. यासाठी झेंडू,तुळस आणि गुलछडी या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे. तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे. देवाचे प्रवेश द्वार, चौखांबी,सोळखांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे.
आज आपण ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!माझ्या भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद ! असं त्यांनी ट्विट केलंय.
देश आज 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील. जनतेला संबोधित करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.