संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी
दीपोत्सवाच्या काळात जळगावच्या सराफ बाजारात सोने व चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र होते. असे असले तरी, धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने-चांदीचे दागिने खरेदी केले. यामुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात २०० ते २५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, दीपोत्सव संपल्यानंतर सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
मागील आठवड्यात दीपोत्सव काळात सोने-चांदीचे भाव वधारले होते. यामुळे दोन आठवड्यांपूर्वी खाली आलेले भाव पुन्हा वाढले. दरम्यान, धनत्रयोदशीच्या दिवशी सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. सोने-चांदीच्या भावात काहीशी घसरण झाल्याने सराफ बाजारात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यानंतर मात्र सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील मोठी वाढ झाली होती, तरीदेखील लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत ग्राहकांनी खरेदी केली. यातून जळगावच्या सराफ बाजारात दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केला.
मागील दोन दिवसांत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. बुधवारी (ता. ११) सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. गुरुवारी (ता. १२) सुवर्ण बाजार उघडल्यानंतर सोन्याचा भाव अडीच हजार रुपयांनी कमी होऊन १ लाख ३९ हजार रुपयांवर आला आहे. तर चांदीचे भावदेखील तब्बल ५ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. बुधवारी (ता. ११) १ लाख ९० हजार रुपये (प्रतिकिलो विनाजीएसटी) असलेली चांदी आज घसरून १ लाख ८५ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.
मागील काही दिवसांतील सोने-चांदीचे दर:
८ नोव्हेंबर: सोने - १ लाख ४२ हजार | चांदी - १ लाख ८८ हजार
९ नोव्हेंबर: सोने - १ लाख ४३ हजार ५०० | चांदी - १ लाख ९१ हजार
१० नोव्हेंबर: सोने - १ लाख ४२ हजार ८०० | चांदी - १ लाख ९० हजार
११ नोव्हेंबर: सोने - १ लाख ४१ हजार ५०० | चांदी - १ लाख ९० हजार
१२ नोव्हेंबर: सोने - १ लाख ३९ हजार | चांदी - १ लाख ८५ हजार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.