रणजित माजगांवकर, साम टीव्ही
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 29 ऑक्टोबरला गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड होणार असून या निवडीत महायुती काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाचा निवडीसाठी होणाऱ्या बैठकीला 14 संचालकांचा कोरम आवश्यक आहे. मात्र सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीकडे 13 संचालक असल्याने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
दरम्यान गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीच्या सर्व 12 संचालकांनी बैठकीला उपस्थित राहावे यासाठी आपण महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आपण त्यांना सहकार्य करण्याची विनंती केल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.
गोकुळचं नुकसान टाळण्यासाठी आणि स्वर्गीय आनंदराव चुयेकर यांच्या योगदानाचा सन्मान राखण्यासाठी शशिकांत चुयेकर यांना अध्यक्ष करण्यासाठी सर्व संचालकांनी सहकार्य करावं, असं आवाहनही सतेज पाटील यांनी केलं आहे. २९ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत महायुतीचे संचालक सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुतीचे संचालक उपस्थित राहणार का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महायुती काय निर्णय घेणार आणि अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार का, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.