पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.
गडचिरोली जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता
हिंगोली, नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यांत येलो अलर्ट
बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. याशिवाय यवतमाळ, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भाबरोबरच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांतही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर अर्नब या अतितीव्र चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. काकीनाडाजवळील यानम परिसरात चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उत्तर किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा धोका वाढला आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेले हे चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी सुमारे १८ किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले. मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजता ते काकीनाडापासून ९० किलोमीटर, विशाखापट्टणमपासून १७० किलोमीटर आणि मच्छलीपट्टणमपासून १७० किलोमीटर अंतरावर होते. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ५० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.