माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
Telegram child sexual abuse material case : छत्रपती संभाजीनगरमध्ये ५०० रुपयांत चाइल्ड पोर्नोग्राफीच्या व्हिडिओंची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेलिग्रामद्वारे बालकांच्या अश्लील व्हिडिओंची विक्री करणाऱ्या बी.कॉम द्वितीय वर्षात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
पार्थ सुनील कुलकर्णी आणि शुभम राजेंद्र लोहाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सायबर पोलिसांनी पकडण्याच्या भीतीने या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लाउड स्टोरेजवरील तब्बल ३,०४१ अश्लील व्हिडिओ डिलीट केले होते.
५ ते ५०० रुपयांना विकायचे व्हिडिओ
हे दोघे टेलिग्रामवर चॅटिंग, डेटिंग आणि पॉर्न ग्रुप्सच्या माध्यमातून या सामग्रीची विक्री करत होते. बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ १०० ते ५०० रुपयांना, तर अश्लील छायाचित्रे अवघ्या ५ रुपयांना विकली जात होती. पार्थ टेलिग्राम खाती चालवून ग्राहकांना साहित्य पाठवायचा, तर शुभम या विक्रीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात यूपीआयद्वारे स्वीकारत होता.
फॉरेन्सिकच्या मदतीने डेटा रिकव्हर करणार
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना १ ऑगस्ट रोजी या प्रकाराबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी संशयितांच्या पालकांना बोलावून समज दिल्यानंतर, २ आणि ३ ऑगस्ट रोजी पार्थ व शुभम पोलिसांसमोर हजर झाले. त्यांच्या मोबाईल व टॅबची तपासणी केली असता क्लाउडवरील व्हिडिओ डिलीट केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तांत्रिक विश्लेषणात त्यांच्याकडे ३,०४१ अश्लील व्हिडिओ असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सध्या २०० व्हिडिओ जप्त केले असून, डिलीट केलेला डेटा फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने रिकव्हर केला जात आहे.
देशभरात पसरले जाळे; डार्कनेटशी कनेक्शन?
शुभमच्या बँक खात्यावरील यूपीआय (UPI) व्यवहारांच्या तपासणीतून २०२३ पासून गुजरात, पंजाब, दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई व पुण्यातील ग्राहकांनी पेमेंट केल्याचे उघड झाले आहे. या खात्यावर दरमहा ६० ते ७० व्यवहारांमधून २० ते २५ हजार रुपये जमा होत होते. पार्थ शुभमव्यतिरिक्त अन्य एका साथीदाराच्या खात्यावरही पैसे स्वीकारत होता.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, पार्थ आणि शुभम हे केवळ वितरक (Distributors) आहेत. एवढा मोठा व्हिडिओ डेटा पुरवणारा मुख्य सप्लायर हा परराज्यातील एका मोठ्या 'डार्कनेट सिंडिकेट'शी जोडलेला असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. गेल्या ३ वर्षांतील या हजारो डिजिटल व्यवहारांची पाळेमुळे शोधल्यास आंतरराज्यीय रॅकेटचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.