२०२९ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा महाराष्ट्रात मास्टर प्लॅन
राहुल गांधींकडे जाणार महाराष्ट्र काँग्रेसच्या रणनीतीचा रिपोर्ट
महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसचे नियोजन
महाराष्ट्रात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केलीय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्यानंतर, काँग्रेस पक्षाने २०२९ च्या निवडणुकीची तयारी आधीच सुरू केलीय. पुढच्या निवडणुकीला अजून अडीच वर्षांहून अधिक काळ बाकी असला, तरी पक्षाने आतापासूनच राज्यातील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची पुण्यात महाबैठक होणार असून येथे लोकसभेसाठी रणनीती आखली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
पुण्यात होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बंटी पाटील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नेते सर्व जिल्हाध्यक्ष, प्रभारी उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये उद्या दुपारी बारा वाजता ही बैठक पार पडणार आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत ठेवण्यासाठी, काँग्रेस महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत एका धोरणात्मक आराखड्यानुसार काम करणार आहे.
यासाठी बूथ स्तरापर्यंतची योजना तयार करण्यात आलीय, त्यापार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून या बैठकीचा अहवाल थेट दिल्लीतील हायकमांड म्हणजेच राहुल गांधींकडे पाठवला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) प्रभारी डॉ. श्रीवेल्ला प्रसाद यांनी पक्षाच्या या योजनेबद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष एक विशेष 'कनेक्ट सेंटर' (संपर्क केंद्र) उभारणार आहे. जिल्हा पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत.
श्रीवेल्ला प्रसाद यांनी सांगितले की, हे ‘कनेक्ट सेंटर्स’ बूथ-स्तरीय कार्यकर्ते आणि राज्य नेतृत्व यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करण्याचे काम करतील. यासह त्यांचा वापर तळागाळातील पक्षाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी आणि संघटनात्मक कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी केला जाणार आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, ‘कनेक्ट सेंटर’मध्ये किमान १६ डेस्क उभारले जातील. प्रत्येक डेस्कवर तीन लोकसभा मतदारसंघांची किंवा १८ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश पक्षनेतृत्व आणि तळागाळातील कार्यकर्ते यांच्यात नियमित, द्विमार्गी संवाद प्रस्थापित करणे आहे. जेणेकरून संघटनेची प्रत्यक्ष स्थिती आणि कार्यकर्त्यांसमोरील आव्हाने यांविषयीची माहिती थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचू शकणार आहे. श्रीवेल्ला प्रसाद यांनी सांगितलं की, या मोहिमेचा उद्देश काँग्रेस पक्षाला केवळ संघटनात्मक अस्तित्व असलेल्या पक्षातून रूपांतरित करून एक सक्रिय आणि प्रभावी संघटनात्मक शक्ती बनवणे आहे.
महाराष्ट्र काँग्रेसच्या या उपक्रमाचा उद्देश तळागाळातील घडामोडींवर लक्ष ठेवणे हा आहे. 'कनेक्ट सेंटर' केवळ पक्ष कार्यकर्त्यांकडून अभिप्राय गोळा करण्यापुरते किंवा संघटनात्मक संवाद सुलभ करण्यापुरते मर्यादित नसेन तर ते राज्य समितीसोबत समन्वय राखण्याचे कामही करणार आहे. यासह या उपक्रमामध्ये मतदार याद्यांची पडताळणी, आंदोलनांचे आयोजन, स्थानिक समित्यांची स्थापना आणि विशिष्ट राजकीय मोहिमांची अंमलबजावणी यांसारख्या कामांचा समावेश असणार आहे.
श्रीवेल्ला प्रसाद यांनी सांगितले की, जे पक्षकार्यकर्ते दीर्घकाळापासून पक्षाशी संबंधित आहेत परंतु सध्या निष्क्रिय आहेत, त्यांच्याशी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून संपर्क साधला जाणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या ‘शक्ती कार्यक्रमांतर्गत’ गोळा केलेली सदस्यत्व नोंदणी आणि माहिती वापरली जाणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश पक्षकार्यकर्त्यांना थेट नेतृत्वाशी जोडून तळागाळातील संघटना अधिक बळकट करणे हा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.