चंद्रपूर : कुठल्याही परिसरातल्या जैवविविधता आणि पर्यावरणाचे निर्देशक म्हणून पक्ष्यांना अधिक महत्त्व असते. चंद्रपुरात जिल्ह्यात साधारणपणे ३५० प्रकारचे पक्षी आढळतात. दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे चंद्रपुर जिल्ह्यातील विविध जलाशयावर हजेरी लावतात. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील इरई परिसरात स्थलांतरित पक्षांचे आगमन झाले आहे.
स्थानिक पक्षी, तर काही स्थलांतरित हिवाळी पक्षी आहेत. स्थलांतरित पक्ष्यांचे दोन प्रकार आहेत. भारतातल्या भारतात स्थलांतर करणारे आणि परदेशातून भारतात हिवाळ्यात येणारे पक्षी आहेत. चंद्रपुरात उत्तरेकडुन म्हणजेच हिमालय, काश्मीर, लडाख इथुनही हिवाळ्यात इथे पक्षी येतात. युरोप, मध्य आशिया, सायबेरिया, मंगोलिया आणि रशिया या भागांमधून येणारे पक्षीसुद्धा हिवाळ्यात बघायला मिळतात. कारण या सर्व प्रदेशांमध्ये कडाक्याची थंडी असते, ते चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिल्लांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधत हिवाळ्यात दूर अंतरावरून स्थलांतर करतात.
पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध लहान- मोठ्या जलाशयांवर यंदा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले. त्यामुळे पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उत्तरेकडे तसेच परदेशात हिवाळ्यात बर्फ पडण्यास सुरुवात होते. तलाव, सरोवर, नद्या आदी पाण्याची ठिकाणं बर्फाने झाकुन जातात. तिथल्या वृक्षांची पानगळ होते. त्यामुळे पक्ष्यांना झाड, जमीन व तलावात मिळणाऱ्या अन्नाचे दुर्भिक्ष जाणवते. म्हणुन हे पक्षी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात.
हजारो किलोमीटरचा प्रवास करत चार महिने मुक्काम
सगळे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करीत दरवर्षी हिवाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरण परिसरात येतात. यात १२ से.मी. आकारापासुन २ फुट उंची पर्यंतचे पक्षी यशस्वीरीत्या स्थलांतर करतात. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते. तसेच वन, उद्यान, शेतपीक आणि कुरण आदी ठिकाणी मुबलक प्रमाणात गवत, विविध प्रकारची वनस्पती, कीटक, सरपटणारे जलचर, उभयचर यांची संख्या वाढल्याने खाद्य उपलब्ध असते. म्हणुनच हे हिवाळ्यात साधारणतः आक्टोबर महिन्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात यायला सुरुवात होते. त्यानंतर चार महिने मुक्काम केल्यानंतर हे पक्षी फेब्रुवारीनंतर परतीच्या प्रवासाला निघतात.
दरम्यान इथल्या जंगल आणि जलाशयावरच ते मुक्काम करतात. यावर्षीसुद्धा इरई धरण व आजुबाजूच्या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. ८ हजार मीटर उंचीवरून सुमारे ४ हजार किमीचा प्रवास करत बार हेडेड गूज (पट्टकादंब हंस) चे आगमन झाले आहे. हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यापैकी एक पक्षी असून तो हिमालय पर्वत ओलांडून भारतात स्थलांतर करत दाखल झाला आहे.
यावर्षी चंद्रपुरातील इरई धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बार हेडेड गूज (पट्टकादंब) जवळपास २४ च्या संख्येत इथे आले आहेत. सोबतच रुडी शेलडक (चक्रवाक), क्वाटन टील (काणुक बदक), गडवाल (मलिन बदक), नो्र्दन पिन्टेल (तलवार बदक), गार्गेनी (भुवयी बदक), को्म्ब डक (नकटा बदक) व रेड क्रिस्टेट पोचार्ड (मोठी लालसरी) हे पक्षीही आढळून आले आहेत. मोठी लालसरी आणि काणुक बदकही मोठ्या संख्येने आढळून आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.