भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार, याची उत्सुकता देशभरातल्या नागरिकांना आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरचे काम सध्या वेगाने सुरू असून १५ ऑगस्ट २०२७ रोजी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन सुरू करण्याचे धैर्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बुलेट ट्रेन सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. मुंबई - अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमुळे देशाच्या रेल्वे वाहतुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवयांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टमधून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग आल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची एकूण लांबी ५०८ किलोमीटर आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमधून हा मार्ग जाईल. या संपूर्ण मार्गावर पूल, स्थानके, ट्रॅक, विद्युत व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांचे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे.
रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गुजरातमधल्या नवसारी परिसरात बुलेट ट्रेन मार्गावर सुरू असलेले काम दाखवण्यात आले आहे. विशेषतः ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याचे या व्हिडिओत दिसते.
बुलेट ट्रेनसाठी अत्याधुनिक ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) प्रणाली उभारली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, या प्रकल्पात ११२५ ट्रॅक किलोमीटरवर संबंधित काम सुरू आहे. ट्रॅकवरील वीजवाहिन्यांना आधार देण्यासाठी तब्बल २२,००० OHE मास्ट उभारले जाणार आहेत.
याशिवाय ओव्हरहेड वायर प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या सुमारे २५,७०० कॅन्टिलीव्हर असेंब्ली बसवण्याचे कामही सुरू आहे. ही संपूर्ण व्यवस्था बुलेट ट्रेनला अतिशय वेगाने धावण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा कमाल वेग ३२० किलोमीटर प्रतितास असण्याची योजना आहे. त्यामुळे सध्या मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावर रेल्वेने प्रवास करण्यासाठी साधारण ६ तासांपर्यंत वेळ लागू शकतो. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा कालावधी सुमारे २ तासांपर्यंत कमी होऊ शकतो.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरवर एकूण १२ स्थानके प्रस्तावित आहेत. मुंबईपासून अहमदाबादपर्यंत या ट्रेनचा मार्ग महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. या मार्गावरील प्रमुख स्थानकांमध्ये मुंबई (BKC), ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, दक्षिण गुजरात आणि गुजरातमधील प्रमुख शहरांमधील प्रवास अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.
१५ ऑगस्ट २०२७ रोजी पहिला टप्पा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले तरी प्रकल्पाच्या कामाची प्रगती आणि अधिकृत वेळापत्रकानुसार अंतिम तारीख निश्चित होईल. सध्या मात्र बुलेट ट्रेनच्या ट्रॅक आणि विद्युतीकरणाच्या कामाला वेग आल्याने देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे सेवेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.