बीड जिल्हा रुग्णालयाला घोटाळ्याचं ग्रहण; 110 कोटींच्या साहित्य खरेदीत घोटाळा?
बीड जिल्हा रुग्णालयाला घोटाळ्याचं ग्रहण; 110 कोटींच्या साहित्य खरेदीत घोटाळा?  SaamTVNews
महाराष्ट्र

बीड जिल्हा रुग्णालयाला घोटाळ्याचं ग्रहण; 110 कोटींच्या साहित्य खरेदीत घोटाळा?

विनोद जिरे

बीड : कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा लोकं मरत होते, तेव्हा बीड जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीरचा (Remdesivir) काळाबाजार आणि साहित्य खरेदीत घोटाळा केला जात होता ? असा गंभीर आरोप होत आहे. तर गेल्या 8 ते 9 महिन्यात जवळपास 12 माहिती अधिकार टाकण्यात आले, मात्र अद्याप एकही माहिती दिली गेली नाही. असाही आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी केलाय.

हे देखील पहा :

बीड (Beed) जिल्हा हा मागासलेला अन् कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुणी ऊसतोडणी करतं, तर कुणी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात मिळेल ते काम करण्यासाठी स्थलांतर करतो. मात्र कोरोना काळात जवळपास या सर्वांचा रोजगार गेला अन् शहराकडे रोजगारासाठी गेलेल्यांना आपल्या गावखेड्यात परतावे लागले. यादरम्यान अनेकांना कोरोनाचा (Corona) सामना करावा लागला. तर शेकडो जणांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. यात कित्येक जणांचा रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे आरोप नातेवाईकांनी केले.

यादरम्यान जीवापोटी अनेकांनी अव्वाच्यासव्वा पैसे देऊन रेमडेसिवीर मिळविले आणि आपल्या नातेवाईकांचा जीव वाचवला. मात्र ज्यावेळी रेमडेसिवीर अभावी लोकं मरत होते, त्यावेळी मात्र तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते आणि माहिती अपिलीय अधिकारी विद्यमान आरएमओ डॉ. सुखदेव राठोड हे रेमडेसिवीरचा काळाबाजार (Black Market) व कोरोना काळात साहित्य खरेदीत घोटाळा करत होते. असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी केलाय.

रेमडेसिवीर काळाबाजार विषयी दीपक थोरात म्हणाले की, ज्यावेळी माणसं मरत होती. त्यावेळी तत्कालीन सीएस गित्ते हे आपल्या स्वतःच्या खाजगी दीप हॉस्पिटलच्या (Hospital) लेटर पॅडवर जास्तीचे रेमडेसिवीर देत होते. यात मुख्यसूत्रधार आरएमओ सुखदेव राठोड असून त्यांच्यासोबत बांगर मॅडम, रियाज, ठाकर यांचा समावेश आहे. त्यांनी अहमदनगर, पुणे येथील हॉस्पिटलला रेमडेसिवीर दिले. या सर्वांनी मोठ्या प्रमाणात काळा बाजार केला असून यांच्यावर गुन्हा का दाखल केला जात नाही. असा सवाल दीपक थोरात यांनी केलाय.

तर कोरोना काळातील साहित्य खरेदीविषयी थोरात म्हणाले, की तत्कालीन सीएस गित्ते यांच्या कार्यकाळात दुसऱ्या लाटेत जी खरेदी करण्यात आली, त्यामध्ये कोणत्याही पेपरला निविदा काढली नाही, जाहिरात दिली नाही. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढिच्या प्रमुख बांगर मॅडम आणि त्यांचा भाऊ गणेश बांगर, बडतर्फ औषध विभाग प्रमुख जायभाये, एजाज, ठाकर यांनी नातेवाईकांच्या नावावर बोगस एजन्सीच्या माध्यमातून 110 कोटींची कागदावर खरेदी केली आहे. त्यामुळं मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली, की जिल्हा रुग्णालयात जाऊन पत्रकारांसमोर ही पाहणी करा. मात्र ते करत नाहीत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचारीच गुत्तेदार झाले आहेत. त्यामुळं कारवाई होत नाही.

पुढे बोलताना थोरात म्हणाले, मी आत्तापर्यंत गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून माहिती अधिकारात माहिती मागत आहे. मात्र ते माहिती देत नाहीत, कारण यामध्ये मुख्यसूत्रधार माहिती अपिलीय अधिकारी डॉ. सुखदेव राठोड हेच आहेत. म्हणजे त्यांचाच घोटाळा आणि तेच माहिती अधिकारी त्यामुळं ते माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. या सर्वांची माहिती मिळाली पाहिजे, मी आतापर्यंत 12 माहिती अधिकार टाकले आहेत. मात्र एकही माहिती त्यांनी दिली नाही. उलट माझ्यावर राजकीय दबाव टाकून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे म्हणाले, की याविषयीची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई करू.

तर याविषयी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, की येणाऱ्या 7 दिवसात जर माहिती दिली नाही. तर मी स्वतःहा त्याठिकाणी जाऊन माहिती घेईल. याविषयीची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली असून याचा तपास पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे आहे. मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान बीड जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोनाने माणसांचा जीवDeaths) घेतला. यादरम्यान अनेकांना रेमडेसिवीर मिळालं नाही तर कित्येक जणांनी अवाच्या सव्वा पैसे देऊन रेमडेसिवीर आणलं. याच काळात आम्ही सेवा देतो या नावाखाली जिल्हा रुग्णालयांमध्ये काळाबाजार आणि घोटाळा बोकाळला. एवढेच नाही तर या विषयाची माहिती अधिकारात माहिती मागितली तर तक्रारदाराला राजकीय दबाव आणि मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे माहिती अधिकारातील उत्तरात दडलंय काय ? असा सवाल उपस्थित केला जात असून या जिल्हा रुग्णालयाला घोटाळ्याच ग्रहण लागलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबदेवीच्या दर्शनाला

Paru And Aditya Wedding : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...

Home Tips: पावसाळा येतोय! तर घरातील लाकडी फर्निचरची घ्या अशी काळजी

Lok Sabha Election: डॉ.मनमोहन सिंह आणि हमीद अन्सारी यांनी घरून केलं मतदान, वयोवृद्ध मतदारांसाठी आयोगाने केली विशेष व्यवस्था

Priyanka Gandhi : माझ्या शहीद आजी आणि शहीद वडिलांना देशद्रोही बोलल्यावर गप्प का बसू? प्रियांका गांधी कडाडल्या

SCROLL FOR NEXT