Beed News: बीडमध्ये राजकीय व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जातंय का ? असाच धक्कादायक प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बळजबरी घुसत, "तुम्ही पालकमंत्र्यांचे फोन का उचलत नाही ? स्वतःला काय समजता ? लावू का पालकमंत्र्यांना फोन ? असं म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप सीईओ अजित पवार यांनी तक्रारीतून केलाय. (Latest Marathi News)
विशेष म्हणजे यावेळी आवाज ऐकून सोडवण्यासाठी आलेले अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप आणी बॉडीगार्ड साळवे यांना देखील अरेरावीची भाषा करत शिवीगाळ करण्यात आली. या प्रकारानंतर खुद्द जिल्हा परिषद सीईओ अजित पवार यांनी बीड शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली असून सदरील फिर्यादीवरून भाजप कार्यकर्ते धनराज मुंडे याच्यावर CR. No. 107/2023, कलम 353, 332, 186, 504 IPC. नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सीईओ अजित पवार यांनी तक्रारीत काय म्हटलं?
"मी बीड जिल्हा परिषद येथे माझ्या दालनामध्ये वॉर रूम विषयाबाबत विकास विठ्ठलराव जानवे, (वॉर रुम शिक्षक) व माझी बैठक चालू होती. त्यावेळी धनराज राजाभाऊ मुंडे रा. वडवणी जि. बीड हे माझ्या दालनामध्ये जबरदस्ती विनापरवाना घुसले. तसेच मला मोठमोठयाने अर्वाच्य भाषेमध्ये बोलू लागले. तेव्हा मी त्यांना महत्वाची बैठक चालू असून सदर बैठक झाल्यानंतर मी तुमचे जे काम असेल त्या बद्दल बोलतो, असे म्हणालो. ",असं सीईओ अजित पवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, "काही कारण नसताना ते माझ्या अंगावर धावून आले व म्हणाले की, आम्ही काय मुर्ख आहोत काय ? तुम्ही पालकमंत्र्यांचे फोन उचलत नाही, तुम्ही स्वतः ला काय समजता, लावू का पालकमंत्र्यांना फोन. तुम्ही पालक मंत्र्यांना बोला, असे मोठ-मोठयाने बोलू लागले. त्याचवेळी आमचा आवाज ऐकून माझे अंगरक्षक पोलीस हवालदार सचिन जानू साळवे व माझे स्वीय सहायक सचिन आप्पाराव सानप असे माझ्या दालनामध्ये आले.
संबंधीत व्याक्तीला मी तसेच माझे अंगरक्षक यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, धनराज राजाभाऊ मुंडे यांनी अधिक आक्रमक होऊन पुन्हा मोठमोठ्याने बोलून अर्वाच्च भाषेमध्ये मला शिवीगाळ केली. त्यावेळी माझे अंगरक्षक पोलीस हवालदार सचिन साळवे यांनी त्यास माझ्या दालनाच्या बाहेर घेऊन जात असताना, धनराज मुंडे याने सचिन साळवे यांचेशी झटापट करुन त्यांना धक्काबुक्की केली व मुक्का मार दिला. तसेच पोलीस हवालदार साळवे यांच्याशी झटापट करुन त्यांचे अंगात असलेल्या शासकीय गणवेशावरील पोलीस पदक तोडुन नुकसान केले. तसेच मी माझ्या दालनामध्ये करत असलेल्या शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला., असं तक्रारित म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यातच विधान परिषद सदस्य असणाऱ्या आमदाराने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना फोनवरून शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याचे नाव घेऊन सीईओ ना शिवीगाळ केल्याने, बीड (Beed) जिल्ह्यात राजकीय व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जातंय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.