अक्षय बडवे, पुणे|ता. ११ मे २०२४
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. पुणे, शिरुरसह ११ मतदार संघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. तत्पुर्वी पुण्याचा गड राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत.
पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. एकीकडे काँग्रेसने रविंद्र धंगेकरांसाठी विदर्भातील नेते प्रचारात उतरवले असतानाच भाजपकडूनही गड राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात तळ ठोकला आहे. आज त्यांची गोखलेनगरमध्ये जाहीर सभा होणार आहे.
आज मध्यरात्री पुण्यात भाजपची लेट नाईट" बैठकही पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते. आगामी टप्प्यातील मतदानाच्या दृष्टिकोनातून पक्षाचे धोरण, मतदानाची घसरलेली टक्केवारी याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आर एस एस चे समन्वयक यांच्यामध्ये या बैठकीत चर्चा झाली.
अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात
महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, यांच्या तोफा आज शिरूर लोकसभा मतदारसंघात धडकणार आहे. त्यामुळे आजचा दिवस शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी महत्त्वाचा दिवस ठरणार असून कोण कोणावर निशाणा साधते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.