लोकसभेच्या राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. १३ जागांवर मतदान होणार आहे. त्याआधीच २००४ च्या राजकारणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काल शरद पवार यांनी एका वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत २००४ मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षफूटीची शक्यता होती आणि अजित पवार त्यावेळी नवखे असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच येत नसल्याचा गौप्यस्फोट केला होता आणि प्रफुल पटेलांवरही निशाणा साधला होता. त्यानंतर आता प्रफुल पटेल यांनी 2004 पासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह धरला होता, अशी कबुली दिली आहे.
होय, मी 2004 पासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगलं काम करून शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले.
हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो.आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारलं. मात्र तरीही शरद पवार यांच्याविषयी आदर कायम असल्याचं पटेलांनी म्हटलं आहे.
त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्यात आला होता. कारण आमच्या पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आणि योग्य उमेदवार नव्हता. अजित पवार २००४ मध्ये राज्याच्या राजकारणात नवखे होते. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यामुळेच काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन सर्वाधिक मंत्रिपदे राष्ट्रवादीला मिळवून दिली होती, असं शरद पवारांनी स्पष्ट करत भाजपसोबत जाण्यावरून होत असलेल्या टीकेवरून त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावरही निशाणा साधला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.