नेहमीप्रमाणे रेल्वेने गावाकडचा प्रवास करत होतो. एका मागून एक गावे- मागे सोडत माझा प्रवास सुरू होता. खिडकीकडे सीट असल्यानं प्रवास अधिकच सूखकर वाटत होता. तुम्ही कितीही एसी असलेल्या गाडीतून प्रवास करा, पण ही अंगाला भिडणारी हवा तुमच्या त्या एसीपेक्षा लाख पटीनं भारी. अहो, तुम्ही कितीही थकलेला असू द्या. क्षणार्धात तुमचा थकवा या गार हवेमुळे झटक्यात दूर होतो. हा विचार करत नाही तोच वाटेत तुझं गाव लागलं. अचानक मनात घालमिसळ सुरू झाली. तुझ्या गावाच्या स्टेशनवर गाडी काही वेळ थांबवल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला, गाडी पुढे जात होती मात्र माझा प्रवास उलटा प्रवास सुरू होता.
रेल्वेच्या धडक-धडक आवाजाने माझ्या हृदयाची धकधक आता वाढवली. याच धकधकीत काळजाच्या खोलवर दडलेली तुझी आठवण लाटांप्रमाणे उसळी मारू लागली. एक-एक क्षण मला आठवू लागला. मनात उसळलेल्या आठवणीच्या लाटेचं पाणी डोळ्यातून बाहेर येऊ लागलं. खरं बोलू! मला तुझी आठवण करायचीच नव्हती. हं, नाही मुळीच नाही. कोण तू आणि कोण मी तुझा. हो आता हेच प्रश्न विचारणं योग्य राहील.
पण मनात पाझरणाऱ्या आठवणीच्या झऱ्यामुळे मला पुन्हा माझ्या प्रेमाच्या सागर तुला आठवण करून द्यावा असं वाटू लागलं. याच भुतकाळातील काळ्याकुट अंधारात दडलेली ती पहिली भेटही मला आठवतेय. त्याचवेळी आठवतीये तुझी ती शेवटची भेट, ज्या दिवशी तू माझ्याशी काही न बोलता सरळ दारातून बाहेर पडलीस. त्यावेळी माझं मन तुला अडवण्याचं म्हणत होतं, पण तुला थांबवण्यात मला काही अर्थ वाटत नव्हता. त्याचमुळे मी टेबलावर पडलेला कागद हाती घेतला आणि पेनाने माझ्या आयुष्यातील अपूर्ण प्रेम, पत्राद्वारे तुला आठवण करून देतोय.
टेबलावर अजूनही तू दिलेली घड्याळ आहे बरं. तू म्हणशील काय गरज त्याची आता, फेकून द्यायची ना. पण तुला माहितीये ना, मला नाते तोडता येत नाही. माहितीये मी तुला नेहमी म्हणायचो, मला तुझ्याशी आयुष्यभर पुरतील इतक्या गप्पा करायच्या आहेत. तुला माझ्याजवळ बसवून तुझा हात माझ्या हातात घेऊन संपूर्ण दिवस तुझ्याशी गप्पा करायच्या होत्या. घरापासून ते दारापर्यंत आणि स्वर्गापासून ते नरकापर्यंत सर्व गोष्टींच्या गप्पा.
आयुष्यातील प्रत्येक वळणावर मला तुझी साथ हवी होती. त्या वळणावर मी तुझ्या आणि तू माझ्या सोबतीला हवी होतीस. तू माझ्या सोबत नाहीस. आयुष्याच्या प्रवासात तू दुसरी वाट धरलीस. काहीही कारण असो, ठीक आहे, पण मला एक गोष्टी आज सांगायची आहे ती म्हणजे.. माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं आणि असेन. पण तुझं माहिती नाही.
मिलना था इत्तिफ़ाक़ बिछड़ना नसीब था
वो उतनी दूर हो गया जितना क़रीब था
तुझाच मी....
टीप: मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?
जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!
प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!
आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...
भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...
तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.