आजच्या डिजिटल युगात लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत जवळपास प्रत्येकजण स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या संपर्कात आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स आणि इंटरनेटवरील विविध माहितीमुळे मुलांचे जग अधिक व्यापक झाले असले, तरी त्याचे काही गंभीर मानसिक परिणामही समोर येत आहेत. सोशल मीडियावर दिसणारी हिंसा, द्वेषपूर्ण मजकूर, सायबर बुलिंग आणि नकारात्मक बातम्यांमुळे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. यालाच ‘डिजिटल ट्रॉमा’ असे म्हटले जाते.
तज्ज्ञांच्या मते, डिजिटल माध्यमांवरील नकारात्मक अनुभवांमुळे मुलांमध्ये चिंता, नैराश्य आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या वागण्यात होणारे बदल वेळीच ओळखले गेले पाहिजे.
सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीविरुद्ध, समाजाविरुद्ध किंवा देशाविरुद्ध होणारी ऑनलाइन हिंसा, द्वेषपूर्ण वक्तव्ये किंवा सायबर बुलिंग पाहिल्यामुळे मुलांच्या मनावर मानसिक आघात होऊ शकतो. याचा मुलांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. काही मुले ऑनलाइन हिंसेतील पीडित व्यक्तीशी स्वतःला जोडून पाहतात. त्यामुळे त्यांच्या मनात भीती, एकटेपणा, असुरक्षितता आणि तणाव निर्माण होतो.
मूलं बराच वेळ शांत, उदास किंवा गुमसुम राहत असेल, तसेच छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड करत असेल, तर हे मानसिक तणावाचे लक्षण असू शकते.
रात्री वारंवार वाईट स्वप्ने पडणे, झोपेतून दचकून उठणे किंवा झोपेचे वेळापत्रक पूर्णपणे बदलणे याकडे दुर्लक्ष करू नये.
छोट्या कारणांवरून प्रचंड राग येणे, भांडणे, इतरांशी शत्रुत्वाने वागणे किंवा आक्रमक प्रतिक्रिया देणे हीदेखील धोक्याची घंटा ठरू शकते.
आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांकडे मुलांसाठी पुरेसा वेळ नसतो. मात्र, मुलांशी किती वेळ बोलतो यापेक्षा त्यांच्याशी किती मोकळेपणाने संवाद साधतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. मुलांना थेट सोशल मीडियाच्या वापराबद्दल प्रश्न विचारण्याऐवजी पालकांनी स्वतःचे ऑनलाइन अनुभव त्यांच्याशी शेअर करावेत. इंटरनेटवर काय पाहायला मिळते, कोणत्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट वाटतात, यावर सहज गप्पा माराव्यात. पालक स्वतः मोकळेपणाने बोलू लागल्यास मुलेही त्यांच्या मनातील गोष्टी सांगण्यास प्रोत्साहित होतात.
मुलांच्या वागण्यात बदल जाणवल्यास त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करू नये किंवा जबरदस्ती करू नये. त्याऐवजी कुटुंबातील सदस्य, शिक्षक आणि शाळेतील समुपदेशक यांच्या मदतीने परिस्थिती समजून घ्यावी. शिक्षक मुलांच्या वर्तनातील बदल लवकर ओळखू शकतात. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्यात नियमित संवाद असणे आवश्यक आहे. अतिचिंता, सतत नियंत्रण ठेवण्याची वृत्ती किंवा मुलांवर स्वतःचे मत लादण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती अधिक बिघडू शकते. पालकांनीही गरजेनुसार समुपदेशनाचा आधार घ्यावा.
काही वेळा मुले सतत मोबाइल वापरण्याकडे वळतात, कारण त्यांच्या आयुष्यात आधीपासूनच काही समस्या असू शकतात. पालकांमधील वाद, अभ्यासाचा ताण, शिकण्यातील अडचणी, नैराश्य किंवा मित्र-शिक्षकांशी असलेले मतभेद यामुळेही मुले डिजिटल माध्यमांचा अधिक आधार घेऊ शकतात. मोबाइलवरील अवलंबित्व गंभीर झाले असेल आणि घरगुती प्रयत्न करूनही सुधारणा होत नसेल, तर बालमानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी.
रात्री झोपताना घरातील सर्व सदस्यांनी आपले मोबाइल फोन स्वतंत्र खोलीत ठेवावेत.
दिवसातील किंवा रात्रीतील काही तास सर्वांनी मोबाइलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
मुलांसोबत पालकांनीही स्क्रीन टाइम कमी करून आदर्श निर्माण करावा.
मोबाइल वापराबाबत मुलांशी चर्चा करून परस्पर संमतीने नियम ठरवावेत.
मुलांना मैदानी खेळ, वाचन, छंद आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी प्रोत्साहित करावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.