Breathing difficulty saam tv
लाईफस्टाईल

Breathing difficulty: 2-3 महिन्यांपासून सुरू होता श्वासाचा त्रास; डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी केली अन् समोर आलं धक्कादायक कारण

तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास आणि छातीत घरघर होत असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत चिकूची बी अडकल्याचे आढळले. डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे बी यशस्वीपणे काढल्यानंतर रुग्णाला तात्काळ आराम मिळाला आणि श्वास पूर्ववत झाला.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास आणि छातीत घरघर जाणवत असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीच्या त्रासाचं खरं कारण अखेर समोर आलं. तपासणी केल्यानंतर त्यांच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत चिकूची बी अडकून राहिल्याचं समोर आलं. नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलच्या फुफ्फुसरोग तज्ज्ञांनी ब्रॉन्कोस्कोपी करून ही बी यशस्वीपणे बाहेर काढली. उपचारानंतर रुग्णाचा श्वास पूर्ववत झाला असून ते आता कोणत्याही त्रासाशिवाय दररोजची कामं करतोय.

उलवेमधये राहणाऱ्या एका ३८ वर्षीय व्यक्तीला गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास अडचण येत होती. तसंच छातीत सतत घरघर होत होती. या त्रासासाठी त्यांनी सुरुवातीला अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले. औषधं घेतल्यानंतर काही काळ आराम मिळायचा, मात्र त्रास पूर्णपणे कमी होत नव्हता. त्यानंतर एका डॉक्टरांनी त्यांना ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा सल्ला दिला.

मेडिकव्हर हॉस्पिटलमधील फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल, डॉ. तनय सिन्हा आणि भूलतज्ज्ञ डॉ. शहाबुद्दीन यांच्या टीमने प्रसाद नाखवा यांची तपासणी केली. एचआरसीटी स्कॅनमध्ये त्यांच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत म्हणजेच लेफ्ट मेन ब्रॉन्कसमध्ये अरुंदपणा असल्याचं दिसलं. मात्र हा अरुंदपणा कफमुळे झाला आहे की, त्यामागे दुसरे काही कारण आहे हे स्कॅनमधून स्पष्ट होत नव्हते.

याबाबत माहिती देताना फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांनी सांगितलं की, ब्रॉन्कोस्कोपी करताना रुग्णाच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत चिकूची बी अडकलेली दिसून आली. या बीमुळे श्वासनलिका जवळपास पूर्णपणे बंद झाली होती. त्याठिकाणी सूज आली होती आणि स्रावही जमा झाला होता. भूल देऊन जाळीसारख्या विशेष उपकरणाच्या म्हणजेच मेश स्नेअरच्या मदतीने ही बी काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आली. बी बाहेर काढताच श्वासनलिका मोकळी झाली आणि रुग्णाला लगेच मोकळा श्वास घेता आला.

डॉ. पटेल यांनी सांगितले की, ही प्रक्रिया सोपी नव्हती. जवळपास तीन महिन्यांपासून बी श्वासनलिकेत अडकून राहिल्यामुळे तिथल्या आतील भिंतीला घट्ट चिकटली होती. त्यातच बियाचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्याने ती उपकरणाच्या मदतीने पकडणेही कठीण होते. जवळपास ५० मिनिटे ही प्रक्रिया सुरू होती. या काळात अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकपणे काम करत कोणतीही दुखापत होऊ न देता बी बाहेर काढण्यात आली.

प्रौढ व्यक्तींच्या श्वासनलिकेत अन्नाचा कण किंवा बी अडकण्याच्या घटना फार कमी आढळतात. मात्र अशा बिया किंवा इतर कठीण वस्तू अनेक महिने श्वासनलिकेत अडकून राहू शकतात. त्यामुळे होणारी लक्षणं कफ साचणं किंवा फुफ्फुसात गाठ होणं यांसारख्या इतर आजारांप्रमाणे दिसू शकतात.

बी बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी सुमारे तीन महिन्यांपूर्वी चिकू खात असताना त्यांना अचानक ठसका लागला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर काही काळाने त्रास कमी झाल्यामुळे त्यांनी या घटनेकडे फारसं लक्ष दिलं नाही. तसंच डॉक्टरांकडे उपचार घेताना ठसका लागल्याची माहितीही सांगितली गेली नव्हती. त्यामुळे आजाराचे नेमके कारण शोधण्यास विलंब झाला.

वेळीच उपचार झाले नसते तर या बीमुळे गंभीर संसर्ग होण्याची शक्यता होती. तसंच वारंवार न्यूमोनिया होणं किंवा डाव्या फुफ्फुसाचा काही भाग काम करणं बंद होणं अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकल्या असत्या. ब्रॉन्कोस्कोपी झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सध्या त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झालीये.

डॉ. तनय सिन्हा यांनी सांगितलं की, जेवताना बोलणं, हसणं किंवा घाई करणं टाळलं पाहिजे. अशा वेळी अन्नाचा कण किंवा फळाची बी चुकून श्वासनलिकेत जाण्याचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. ठसका लागल्यानंतर बराच काळ खोकला, घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Castor Oil: महिलांनी नाभीत २ थेंब एरंडेल तेल सोडावे, १५ दिवसांत दिसेल चमत्कार

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का

Weak Eyesight : डोळ्यांच्या या त्रासांकडे दुर्लक्ष करताय? असू शकतो नजर कमजोर झाल्याचा इशारा

Wall Clock Direction: घरामध्ये घड्याळ कोणत्या भितींवर लावावे? योग्य दिशा कोणती?

Blood Sugar Control: रक्तात वाढलेली साखर कमी करण्यासाठी दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे?

SCROLL FOR NEXT