हिवाळ्यात कोकण ट्रिप करा
थंडगार वातावरणात किल्ल्यावर फिरण्याची मजाच वेगळी
किल्ल्यावर फिरताना इतिहासाची उजळणी करा
हिवाळ्यात कोकण भटकंतीसाठी नक्की जा. ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान आल्हाददायक हवामान, स्वच्छ आकाश आणि समुद्राची थंडगार हवा यामुळे ऐतिहासिक किल्ले पाहण्याचा आनंद आणखी वाढतो. कोकणात समुद्राच्या लाटांमध्ये उभे असलेले जलदुर्ग, डोंगरकड्यांवरील किल्ले आणि मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास सांगणारे अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत.
रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळ अरबी समुद्रात एका बेटावर वसलेला जंजिरा किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध जलदुर्गांपैकी एक आहे. हा किल्ला अनेक शतकांच्या संघर्षानंतरही अजिंक्य राहिल्यामुळे विशेष ओळखला जातो.सुरुवातीला स्थानिक कोळी बांधवांनी समुद्री चाच्यांपासून संरक्षणासाठी येथे लाकडी तटबंदी उभारली होती. १५६७ मध्ये मलिक अंबरने या ठिकाणी मजबूत दगडी किल्ला बांधला. किल्ल्याला भक्कम तटबंदी आणि २२ बुरूज आहेत.किल्ल्यातील ऐतिहासिक तोफा आणि समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून जवळच समुद्रात असलेला कुलाबा किल्ला हा मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याची आठवण करून देणारा ऐतिहासिक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.कुलाबा किल्ला मराठ्यांच्या सागरी संरक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचे ठिकाण होते. किल्ल्याभोवती मजबूत दगडी तटबंदी आणि बुरूज आहेत. किल्ल्यात मंदिरे, पाण्याची टाकी आणि ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.
रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावाजवळ डोंगराच्या कड्यावर वसलेला कोर्लई किल्ला इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. या किल्ल्याला पोर्तुगीजकालीन वारसा लाभला आहे. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी या भागात आपले वर्चस्व मजबूत करण्यासाठी किल्ल्याची उभारणी केली. जवळच असलेला कोर्लई दीपगृह आणि समुद्राचे दृश्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे.किल्ल्यावर दगडी तटबंदी, बुरूज आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ हर्णे बंदराच्या समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ला आहे. समुद्रातील बेटावर बांधलेला हा किल्ला मराठ्यांच्या आरमारी सामर्थ्याचा महत्त्वाचा भाग होता. या किल्ल्याची सुरुवात १६व्या शतकात विजापूरच्या सत्ताधीशांच्या काळात झाल्याचे मानले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्याजवळ समुद्रात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सागरी इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या सागरी आक्रमणांना रोखण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली. १६६४ मध्ये किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि साधारण १६६७ पर्यंत ते पूर्ण झाले. किल्ल्याची तटबंदी, बुरूज आणि प्रवेशद्वार संरक्षणाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा कोकणातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा समुद्रकिनारी किल्ला आहे. पूर्वी या किल्ल्याला 'घेरिया' असे म्हटले जात होते. अरबी समुद्र आणि वाघोटण खाडीच्या परिसरातील त्याचे स्थान संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. शिलाहार राजवंशातील राजा भोज द्वितीय यांच्या काळात १२व्या शतकात या किल्ल्याची उभारणी झाली.
टीप - वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.