तुम्हीही किचन टॉवेल कितीही वेळा धुतला तरी, काही दिवसांनी त्याला विचित्र वास येऊ लागतो. विशेषतः जर तो टॉवेल रोज भांडी पुसण्यासाठी, हात पुसण्यासाठी किंवा स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी वापरला जात असेल, तर त्याला आंबट किंवा कुबट वास येऊ लागतो. कधीकधी, धुतल्यानंतरही तो वास पूर्णपणे जात नाही.
खरं तर, यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे कपडे बराच काळ ओले राहतात. विशेषतः सुती कपडे पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतात आणि वापरानंतर अनेक तास ओलावा टिकवून ठेवतात. हा ओलावा जिवाणूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतो आणि हळूहळू कपड्यांना वास येऊ लागतो. त्यामुळे, केवळ वारंवार कपडे धुणे हा कायमस्वरूपी उपाय नाही. वापरानंतर लगेच कपडे वाळवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
वापरल्यानंतर किचनचा कपडा कुठेही गुंडाळून किंवा एका बाजूला फेकून देऊ नका. ओला कपडा तसाच ठेवल्यामुळे आतमध्ये ओल राहते, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. वापर झाल्यानंतर कपडा पूर्णपणे पसरवून अशा ठिकाणी टांगा जिथे हवा खेळती राहील.
हात पुसण्यासाठी, भांडी सुकवण्यासाठी, ओटा साफ करण्यासाठी किंवा गॅसवर सांडलेले अन्न पुसण्यासाठी एकाच कपड्याचा वापर करणे चुकीचे आहे. प्रत्येक कामामुळे कपड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घाण आणि ओलावा साचतो, ज्यामुळे दुर्गंधी लवकर येऊ लागते. त्यामुळे हात पुसण्यासाठी आणि किचन साफ करण्यासाठी वेगवेगळे कपडे ठेवा.
कपडे मऊ करण्यासाठी अनेकजण फॅब्रिक सॉफ्टनर वापरतात, पण किचनच्या कपड्यांच्या बाबतीत हा पर्याय नेहमीच योग्य ठरत नाही. सॉफ्टनरमुळे कपड्याच्या धाग्यांवर एक पातळ थर तयार होतो, ज्यामुळे कपड्यातील पाणी लवकर सुखत नाही. ओलावा जास्त वेळ टिकून राहिल्याने बॅक्टेरिया वाढतात.
कपड्याला आधीपासूनच दुर्गंधी सुटली असेल, तर तो गरम पाण्यात धुवावा. यामुळे बॅक्टेरिया आणि जमा झालेली घाण कमी होण्यास मदत होते. कपडे धुताना किंवा भिजवताना बेकिंग सोडा किंवा पांढऱ्या व्हिनेगरचा वापर केल्यानेही दुर्गंधी काही प्रमाणात दूर होऊ शकते.
वारंवार धुवूनही किचनच्या कपड्या्रून वास जात असेल, तर कपड्याचा प्रकार बदलून पाहू शकता. जे कपडे पाणी जास्त वेळ धरून ठेवत नाहीत आणि लवकर सुकतात, अशा मटेरियलचा वापर करावा. कॉटनचे कपडे पाणी चांगले शोषून घेतात, पण त्यामुळे ओलावाही जास्त वेळ टिकून राहतो.
टीप: किचनमधील स्पंजचीही अशीच समस्या असू शकते. वापरल्यानंतर स्पंजमधील पाणी पूर्णपणे पिळून तो मोकळ्या हवेच्या ठिकाणी ठेवावा, जेणेकरून तो लवकर सुकेल आणि दुर्गंधी येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.