हातांची काळजी घेताना आपण अनेकदा नखांकडे लक्ष देतो. मात्र नखांच्या आजूबाजूच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेकदा नखांच्या बाजूची छोटीशी त्वचा निघू लागते. सुरुवातीला ही गोष्ट साधी वाटते. पण ही त्वचा ओढून काढली किंवा दातांनी तोडली तर बोटाला दुखापत होऊ शकते. काही वेळा रक्तही येऊ शकते.
बदलत्या हवामानामुळे त्वचा कोरडी पडणं, वारंवार हात धुणं, तसंच भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साबणाचा आणि डिटर्जंटचा संपर्क यामुळे ही समस्या वाढू शकते. मात्र रोजच्या सवयींमध्ये काही छोटे बदल केले तर नखांच्या बाजूची त्वचा फाटण्यापासून वाचवता येऊ शकते. नखांच्या बाजूची त्वचा का निघते आणि तिची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊया.
नखांच्या कडेची त्वचा निघण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्वचा कोरडी पडणं. याशिवाय रोजच्या कामांमुळेही ही समस्या वाढू शकते.
दिवसभरात अनेकदा साबण आणि पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे हातांवरील त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे नखांच्या बाजूची त्वचा निघण्याची शक्यता वाढते.
भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा साबण, कपडे धुण्याचा डिटर्जंट आणि घराच्या साफसफाईसाठी वापरली जाणारे इतर प्रोडक्स्ट यांच्यामुळेही त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो.
वारंवार सॅनिटायझर लावल्यामुळे काही लोकांच्या हातांची त्वचा कोरडी पडते. याचाही परिणाम नखांच्या आजूबाजूच्या त्वचेवर होऊ शकतो.
नखांच्या बाजूला त्वचा निघाली की ती ओढून काढण्याची किंवा दातांनी तोडण्याची सवय अनेकांना असते. मात्र असं केल्यामुळे त्वचा आणखी फाटू शकते आणि त्रास वाढू शकतो
हात धुतल्यानंतर ते स्वच्छ टॉवेलने व्यवस्थित कोरडे करा. त्यानंतर हातांना मॉइश्चरायझर लावा. केवळ हातांवरच नाही, तर नखांच्या आजूबाजूलाही मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. रात्री झोपण्यापूर्वी नखांच्या बाजूच्या त्वचेवर पेट्रोलियम जेली लावू शकता. यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. परिणामी, त्वचा कोरडी पडणे आणि फाटणे कमी होऊ शकते.
नखांच्या बाजूची त्वचा बाहेर आली असेल तर बोट काही वेळ कोमट पाण्यात ठेवू शकता. यामुळे त्या भागातील त्वचा मऊ होण्यास मदत होते. यानंतर स्वच्छ टॉवेलने बोट व्यवस्थित पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. मात्र पाणी खूप गरम नसावं. तसंच बोटे जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नका.
नखांच्या बाजूला त्वचा निघालेली दिसली की ती ओढून काढावी किंवा दातांनी तोडावी, असे वाटू शकते. पण असे करणे टाळा. त्वचा ओढल्यामुळे ती आणखी फाटू शकते. यामुळे बोटाला दुखापत होणं, रक्त येणं आणि जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. निघालेली त्वचा एखाद्या वस्तूमध्ये वारंवार अडकत असेल तर स्वच्छ नेलकटरने केवळ बाहेर आलेला आणि सैल झालेला भाग काळजीपूर्वक कापून घ्या.
दररोज भांडी घासताना किंवा घराची साफसफाई करताना डिटर्जंट आणि क्लिनरचा वापर केला जातो. या पदार्थांचा वारंवार संपर्क आल्यामुळे हातांची त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे भांडी घासताना आणि साफसफाई करताना हातमोजे वापरणं फायदेशीर ठरतं. यामुळे हातांचा पाणी आणि स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांशी थेट संपर्क कमी होतो.
त्वचा लाल होणं
बोटाला सूज येणं
तीव्र वेदना होणं
त्या भागात नेहमीपेक्षा जास्त गरमपणा जाणवणं
जखमेतून पू येणं
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.