दारू पिणं आरोग्यासाठी घातक असून दारूचा सर्वाधिक वाईट परिणाम आपल्या लिव्हरवर म्हणजेच यकृतावर होतो. नियमित दारू प्यायल्याने लिव्हर खराब होऊ शकतं, हे अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, तो म्हणजे किती वर्ष दारू प्यायल्याने लिव्हर खराब होतं? डॉक्टरांनी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलंय.
दारू प्यायला सुरुवात केल्यानंतर नेमक्या किती वर्षांनी लिव्हर खराब होतं याचं ठराविक उत्तर देता येत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर दारूचा परिणाम वेगवेगळा होतो. एखादी व्यक्ती किती प्रमाणात दारू पिते, किती वेळा पिते, तिचं वय किती आहे, शरीराची रचना आणि जेनेटीक कारणं काय आहेत तिचा आहार कसा आहे आणि आधीपासून काही आजार आहेत का, या सगळ्या गोष्टींवर लिव्हरचं नुकसान अवलंबून असतं.
काही लोकांमध्ये नियमित दारू प्यायल्याच्या काही वर्षांतच लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते. तर काही लोकांमध्ये अनेक वर्ष दारू पिऊनही लिव्हरचं गंभीर नुकसान झाल्याची लक्षणं लगेच दिसत नाहीत. त्यामुळे दारू प्यायला सुरुवात केल्यानंतर काही वर्षं लिव्हरला त्रास होणार नाही असं समजणं चुकीचं आहे.
दारूच्या सेवनामुळे लिव्हरचा आजार साधारणपणे तीन टप्प्यांत वाढू शकतो.
हा लिव्हरच्या आजाराचा सुरुवातीचा टप्पा आहे. यामध्ये लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते. या टप्प्यात दारू पिणं पूर्णपणे बंद केल्यास अनेकदा लिव्हर पुन्हा पूर्ववत होऊ शकतं.
या टप्प्यात दारूमुळे लिव्हरला सूज येते. लिव्हरच्या पेशींनाही नुकसान पोहोचू लागतं. त्यामुळे लिव्हरचं काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते.
हा सर्वात गंभीर टप्पा आहे. यामध्ये लिव्हरच्या निरोगी पेशींच्या जागी जखमेप्रमाणे कायमस्वरूपी व्रण तयार होतात. याला फायब्रोसिस म्हणतात. त्यामुळे लिव्हरची काम करण्याची क्षमता कमी होते.
लिव्हरचा आजार सुरुवातीला अनेकदा लक्षातही येत नाही. सुरुवातीच्या काळात कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे लिव्हरचं नुकसान होत असतानाही अनेकांना त्याची माहिती नसते.
मात्र काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सतत थकवा जाणवणं, भूक कमी होणं, पोटाला सूज येणं, डोळे आणि त्वचा पिवळी पडणं, पायांना सूज येणं आणि लघवीचा रंग गडद होणं ही लिव्हरच्या आजाराची संभाव्य लक्षणं असू शकतात. ही लक्षणं दिसण्याची वाट पाहणं योग्य नाही. जे लोक नियमितपणे दारू पितात, त्यांनी वेळोवेळी लिव्हरची तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
नियमित दारू पिणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजेच LFT, अल्ट्रासाऊंड आणि गरजेनुसार फायब्रोस्कॅन या तपासण्या करून घ्याव्यात. या तपासण्यांमुळे लिव्हरची स्थिती समजण्यास मदत होते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, दारूची कोणतीही मात्रा लिव्हरसाठी पूर्णपणे सुरक्षित मानता येत नाही. लिव्हरला गंभीर नुकसान होऊ नये यासाठी दारू पूर्णपणे बंद करणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे. एखाद्याला आधीच लिव्हरचा आजार असल्याचं समोर आलं असेल तर उशीर न करता लिव्हरच्या आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.