गेल्या सहा महिन्यांपासून लघवीतून रक्त येत असल्याने त्रस्त असलेल्या १५ वर्षांच्या एंजल या श्वानावर पुण्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केलीये. एंजलच्या मूत्राशयात कॅन्सरच्या दोन गाठी होत्या. प्रत्येकी दोन सेंटीमीटर आकाराच्या या गाठी डॉक्टरांनी पोटाला चिरा न देता काढल्या. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १५ मिनिटांत एंजल चालू लागली. भारतात श्वानाच्या मूत्राशयातील कॅन्सरच्या गाठी काढण्यासाठी अशा पद्धतीची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच केल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
एंजल ही शिह त्झू जातीची मादी श्वान असून तिचं वजन केवळ ५.६ किलो आहे. वाढतं वय, कमी वजन आणि गाठींची जागा लक्षात घेऊन डॉक्टरांनी मोठी शस्त्रक्रिया करण्याऐवजी आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकचे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. यासाठी ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ युरिनरी ब्लॅडर ट्यूमर (TURBT) या तंत्राचा वापर करण्यात आला.
एंजलला गेल्या सहा महिन्यांपासून लघवी करताना रक्त येत होतं. मात्र तिची भूक आणि खाणंपिणं व्यवस्थित असल्याने सुरुवातीला हा त्रास मूत्रमार्गातील इन्फेक्शन किंवा मुतखड्यामुळे होत असावा असा अंदाज होता. रक्तस्राव थांबत नसल्याने एंजलच्या मालक मिस अरोरा यांनी ११ सप्टेंबर रोजी तिला पुण्यातील द स्मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये आणलं.
तपासणीदरम्यान तिच्या लघवीत कॅन्सरच्या पेशी आढळल्या. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील तपासण्या केल्या. सीटी स्कॅनमध्ये मूत्राशयात प्रत्येकी दोन सेंटीमीटर आकाराच्या दोन गाठी असल्याचं दिसून आलं. पुढील तपासणीत या गाठी ट्रान्झिशनल सेल कार्सिनोमा (TCC) या प्रकारच्या कॅन्सरच्या असल्याचं स्पष्ट झालं.
एंजलचे वय १५ वर्षे असून कमी वजन आणि गाठींचं स्थान यामुळे पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणं कठीण होतं. अशा शस्त्रक्रियेत पोटाला चिरा द्यावा लागतो. त्यामुळे एंजलला कमी त्रास व्हावा आणि रक्तस्रावही कमी व्हावा, यासाठी डॉक्टरांनी नैसर्गिक मूत्रमार्गातून गाठी काढण्याचा पर्याय निवडला.
या शस्त्रक्रियेचं नेतृत्व डॉ. नरेंद्र परदेशी यांनी केलं. ते पशुवैद्यकीय क्षेत्रात कमीत कमी छेद देऊन शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ आहेत. या शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, “एंजलचे वय १५ वर्षे असून तिचं वजन केवळ ५.६ किलो आहे. इतक्या वयस्कर आणि कमी वजनाच्या श्वानावर मोठी शस्त्रक्रिया करणं जोखमीचं ठरू शकतं. तिची भूक व्यवस्थित होती तरी सहा महिन्यांपासून लघवीतून रक्त येत असल्याने या त्रासाकडे दुर्लक्ष करता येणार नव्हते. तपासणीत हा त्रास साध्या संसर्गामुळे किंवा मुतखड्यामुळे नसून मूत्राशयातील कॅन्सरच्या दोन गाठींमुळे होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पोटाला चिरा न देता नैसर्गिक मूत्रमार्गातून गाठी काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी TURBT या आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला.”
११ सप्टेंबर रोजी झालेल्या या शस्त्रक्रियेला सुमारे अडीच ते तीन तास लागले. यामध्ये मादी श्वानाच्या जननमार्गातून आणि मूत्रमार्गातून एक सूक्ष्म कॅमेरा मूत्राशयापर्यंत नेण्यात आला. त्यानंतर रिसेक्टोस्कोप या विशेष उपकरणाच्या मदतीने मोनोपोलर तंत्रज्ञान वापरून मूत्राशयातील दोन्ही गाठी काळजीपूर्वक काढण्यात आल्या.
डॉ. परदेशी यांनी सांगितलं की, संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान ०.५ मिलीपेक्षाही कमी रक्तस्राव झाला. पाच ते सहा किलो वजनाच्या श्वानासाठी हे महत्त्वाचं आहे. पारंपरिक शस्त्रक्रियेत तुलनेने अधिक रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
एंजलला भूल देऊन व्हेंटिलेटरच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत ती चालू लागली. त्याच दिवशी तिला घरी सोडण्यात आलं. पुढील दोन ते तीन दिवसांत तिच्या लघवीतील रक्तस्राव कमी झाला आणि लघवी पूर्ववत होऊ लागली. त्यानंतर पुन्हा रक्तस्राव झालेला नाही.
शस्त्रक्रियेला सुमारे तीन आठवडे झाले असून एंजल आता एक्टिव्ह आहे. तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलंय.
मानवी वैद्यकीय उपचारांमध्ये मूत्राशयातील गाठी काढण्यासाठी TURBT या तंत्राचा नियमित वापर केला जातो. मात्र पशुवैद्यकीय उपचारांमध्ये ही शस्त्रक्रिया करणं तांत्रिकदृष्ट्या कठीण असतं. एंजलवर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे भविष्यात प्राण्यांवरील अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये कमीत कमी छेद देणाऱ्या आधुनिक पद्धती वापरण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. या पद्धतीमुळे काही प्राण्यांना मोठ्या शस्त्रक्रियेमुळे होणारा त्रास टाळता येण्याची शक्यता आहे
शस्त्रक्रियेदरम्यान काढलेल्या गाठींचे टिश्यू तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. या तपासणीला हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी म्हणतात. यामधून कॅन्सरचा प्रसार किती झाला आहे, याचं मूल्यांकन केलं जातं. या तपासणीचे अंतिम निष्कर्ष आल्यानंतर एंजलला पुढे कोणते उपचार द्यायचे, हे ठरवले जाणार आहे. गरज भासल्यास संपूर्ण शरीरावर परिणाम करणारी केमोथेरपी देण्याऐवजी थेट मूत्राशयात कॅन्सरविरोधी औषधं देण्याच्या पर्यायाचाही विचार केला जाऊ शकतो.
डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, “श्वानाच्या लघवीतून सातत्याने रक्त येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः वयस्कर श्वानांमध्ये असे लक्षण दिसल्यास सखोल तपासणी करणं आवश्यक आहे. सुरुवातीला हा त्रास साध्या संसर्गामुळे किंवा मुतखड्यामुळे असल्याचं वाटू शकतं. मात्र, काही वेळा त्यामागे कॅन्सरसारखं गंभीर कारणही असू शकते.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.