घरात कितीही महागडा आणि सुंदर बेड असला तरी त्यावरची चादर जागोजागी निघालेली असेल त्यावर सुरकुत्या पडल्या असतील आणि उशा अस्ताव्यस्त पडल्या असतील तर संपूर्ण खोलीचा लुक खराब दिसतो. अनेक घरांमध्ये सकाळी उठल्यानंतर बेडची अशीच अवस्था पाहायला मिळते.
पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथला बेड नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटका दिसतो. चादरीवर एकही सुरकुती नसते आणि उशाही अगदी व्यवस्थित ठेवलेल्या असतात. हे पाहिल्यानंतर आपल्याही घरातला बेड असाच सुंदर दिसावा, असं अनेकांना वाटतं.
पण तुम्हाला माहिती आहे का? हॉटेलसारखा बेड तयार करण्यासाठी महागडी गादी किंवा खास डिझाइनच्या चादरी घेण्याची गरज नाही. चादर अंथरण्याची योग्य पद्धत, तिचे कोपरे व्यवस्थित गादीखाली दाबणं आणि उशा नीट लावणं अशा छोट्या गोष्टींमुळे बेडचा संपूर्ण लुक बदलू शकतो.
बेड हॉटेलसारखा स्वच्छ आणि नीटनेटका दिसण्यासाठी सर्वात आधी गादी आणि बेडवरील धूळ साफ करा. चादर बदलण्यापूर्वी व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने गादी स्वच्छ करून घ्या. तसंच उशा आणि ब्लँकेटचीही वेळोवेळी स्वच्छता करा. यामुळे बिछाना स्वच्छ राहील आणि त्याला फ्रेश लुक मिळेल.
बेड सुंदर दिसण्यासाठी चादर योग्य पद्धतीने अंथरणं खूप महत्त्वाचं आहे. चादरीवर सुरकुत्या पडल्यामुळे संपूर्ण बेडचा लुक खराब होतो. त्यामुळे सर्वात आधी गादीवर चादर व्यवस्थित पसरवा. हाताने चादरीवरील सुरकुत्या काढा आणि चारही बाजूंनी ती सारखी असल्याची खात्री करा. त्यानंतर चादरीच्या कडा गादीखाली व्यवस्थित दाबून ठेवा.
रात्री झोपताना चादर विस्कटते आणि उशाही जागेवरून सरकतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी बेड नीट करा. चादर सरळ करा, तिचे कोपरे पुन्हा गादीखाली दाबा आणि उशा योग्य जागी ठेवा. तसंच ब्लँकेट किंवा कंफर्टर व्यवस्थित पसरून घ्या. यासाठी फार वेळ लागत नाही.
बेड सुंदर आणि नीटनेटका दिसण्यासाठी उशा ठेवण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. उशा नेहमी बेडच्या डोक्याकडील बाजूला सरळ ठेवा. तुमच्याकडे दोन किंवा चार उशा असतील, तर त्या सारख्या पद्धतीने लावा. उशीच्या कव्हरवरील सुरकुत्याही हाताने काढून टाका. याशिवाय बेड आणखी सुंदर दिसावा यासाठी पुढच्या बाजूला एक किंवा दोन छोटे डेकोरेटिव्ह कुशन ठेवू शकता.
अनेकदा चांगली चादर अंथरल्यानंतरही बेड सुंदर दिसत नाही. यामागे जुनी झालेली किंवा मधल्या बाजूने दबलेली गादी हे कारण असू शकतं. त्यामुळे गादीची स्थितीही वेळोवेळी तपासा. गादी चांगली असेल पण झोपताना अधिक आराम हवा असेल तर मॅट्रेस पॅडचा वापर करू शकता. हे गादी आणि चादरीच्या मध्ये अंथरले जाते. यामुळे गादीला अधिक मऊपणा मिळतो.
बेडवर कंफर्टर म्हणजेच जाड चादर वापरत असाल तर तीही व्यवस्थित अंथरणं गरजेचं आहे. कंफर्टर बेडवर पूर्ण पसरवा आणि दोन्ही बाजूंना त्याचा भाग सारखा ठेवा. त्यावर सुरकुत्या असतील तर हाताने त्या काढून टाका. तुम्हाला हवं असल्यास बेडच्या डोक्याकडील बाजूने कंफर्टरचा थोडा भाग दुमडून ठेवू शकता.
बेड बराच काळ स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा असेल तर चादर आणि उशांची कव्हर वेळोवेळी धुणं गरजेचं आहे. गादीवर साचलेली धूळ काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करा. तसंच उशा नियमितपणे फुलवून घ्या. यामुळे उशांचा आकार टिकून राहण्यास मदत होते आणि बेडही अधिक छान दिसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.