आजच्या काळात हार्ट अटॅकचा त्रास कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. पूर्वी ६० वर्षांच्या व्यक्तींना हार्ट अटॅक आल्याच्या घटना ऐकायला मिळायच्या. मात्र आता ३० ते ३५ वर्षांच्या तरुणांनाही हार्टच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एखाद्या व्यक्तीच्या तपासणीच्या रिपोर्टमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ७० किंवा ८० टक्के ब्लॉकेज असल्याचे समोर आले, तर संपूर्ण कुटुंबाची चिंता वाढते. आता बायपास सर्जरी करावी लागणार, त्यासाठी लाखो रुपये खर्च होतील आणि रुग्ण पूर्वीसारखा बरा होईल की नाही, असे अनेक प्रश्न कुटुंबीयांच्या मनात येतात.
याच भीतीचा फायदा घेऊन इंटरनेट आणि सोशल मीडियावर अनेक दावे केले जातात. लसूण, आले आणि लिंबाचा काढा प्यायल्याने हृदयाच्या बंद रक्तवाहिन्या सहज उघडतात, तर काही चूर्णांमुळे ब्लॉकेज वितळून जातं, असं सांगितलं जातं. मात्र खरंच कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता हृदयातील ब्लॉकेजवर उपचार करता येतात का? याबाबत डॉक्टर काय सांगतात, हे सोप्या भाषेत समजून घेऊया.
सुरुवातीच्या काळात अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. काही व्यक्तींना ब्लॉकेज असूनही त्याची जाणीव होत नाही. मात्र, रक्तवाहिन्यांमधील अडथळा वाढू लागला की शरीरात काही लक्षणे दिसू शकतात.
वेगाने चालताना, जिने चढताना किंवा जड वस्तू उचलताना छातीच्या मध्यभागी जडपणा, दाब किंवा जळजळ जाणवणं.
थोडे चालल्यानंतरही धाप लागणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं.
कोणतंही जड काम केलं नसतानाही सतत थकवा आणि सुस्ती जाणवणं.
छातीत सुरू झालेली वेदना हळूहळू डाव्या हातात, खांद्यात, मानेत, जबड्यात किंवा पाठीत जाणं.
अचानक अस्वस्थ वाटणं, कपाळावर थंड घाम येणं आणि चक्कर येणं.
डॉ. विवेक टंडन सांगतात की, हार्ट ब्लॉकेज ही गंभीर स्थिती आहे. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल, चरबी आणि इतर घटक जमा झाल्यामुळे त्या अरुंद होतात. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी, छातीत दुखणं, धाप लागणं आणि रोजची कामं करताना त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात. मात्र काही रुग्णांमध्ये कोणतीही बाह्य लक्षणं दिसत नाहीत.
डॉ. टंडन स्पष्ट करतात की, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असलेल्या प्रत्येक रुग्णाला ओपन हार्ट किंवा बायपास सर्जरीची गरज असतेच असं नाही. ब्लॉकेज किती टक्के आहे, ते रक्तवाहिनीच्या कोणत्या भागात आहे, रुग्णाला कोणता त्रास होतो आणि त्याची एकूण प्रकृती कशी आहे, यावर उपचार ठरतात.
ब्लॉकेज सुरुवातीच्या टप्प्यात असेल किंवा रुग्णाची स्थिती स्थिर असेल तर डॉक्टर औषधं आणि जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देऊ शकतात. यामुळे आजार नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी करणारी स्टॅटिन्स (Statins), तसंच रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी औषधं हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करतात.
मात्र औषधांमुळे आधीच तयार झालेला जुना आणि कठीण प्लाक पूर्णपणे विरघळून नाहीसा होतो असं नाही. ही औषधे कोलेस्ट्रॉल कमी करतात नवीन प्लाक तयार होण्याचा धोका कमी करतात आणि आधीपासून असलेला प्लाक स्थिर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे प्लाक फुटून रक्ताची गुठळी तयार होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
आजकाल इंटरनेटवर लसूण, आलं, लिंबाचा रस आणि सफरचंदाच्या व्हिनेगरपासून तयार केलेलं पाणी प्यायल्याने हृदयाच्या सर्व बंद रक्तवाहिन्या आपोआप उघडतात, असे दावे केले जातात. मात्र, डॉ. विवेक टंडन यांनी अशा दाव्यांबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही घरगुती उपायाने, डिटॉक्स ड्रिंकने किंवा सप्लिमेंटने हृदयाच्या बंद रक्तवाहिन्या उघडतात याला ठोस वैज्ञानिक किंवा वैद्यकीय पुरावा नाही.
लसूण किंवा आल्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या काही बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. मात्र रक्तवाहिनीमध्ये ८० टक्के जमा झालेला कठीण प्लाक अशा पाण्यामुळे निघून जातो, असं मानणं चुकीचं आहे. अशा घरगुती उपायांवर विश्वास ठेवून डॉक्टरांनी दिलेली रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करणारी किंवा कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे स्वतःहून बंद करू नयेत. औषधं अचानक बंद केल्यास रक्ताची गुठळी तयार होण्याचा आणि गंभीर हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
जेवणातील तेलकट पदार्थ कमी करा
दररोज ३० मिनिटे चाला
तंबाखू आणि सिगारेटपासून दूर राहा
रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
तणाव कमी करा आणि पुरेशी झोप घ्या
हार्ट अटॅकच्या बाबतीत वेळेला खूप महत्त्व असतं. एखाद्या व्यक्तीला अचानक छातीच्या मध्यभागी तीव्र वेदना किंवा जड दाब जाणवणं, श्वास घेण्यास त्रास होणं, थंड घाम येणं किंवा छातीतील वेदना डाव्या हातापर्यंत आणि जबड्यापर्यंत जाणं अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.